
आपल्या वापरकर्त्यांची माहिती विकण्याबद्दल सोशल मीडिया संकेतस्थळ फेसबुक पुन्हा गोत्यात आले आहे. अॅपल, अॅमॅझोन, सॅमसंग अशा कंपन्यांना ही माहिती विकण्यात आल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला असून कंपनीनेही तो मान्य केला आहे. मात्र यात गैर काहीही नाही, असा दावा फेसबुकने केला आहे.
फेसबुक पुन्हा गोत्यात – वापरकर्त्यांची माहिती विकली
फेसबुकने या आणि अशा 60 उपकरण निर्मात्या कंपनींसोबत करार केला असून त्यांना 2007 पासूनची माहिती विकली आहे, असे न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने म्हणाले आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने फेसबुकच्या 8 कोटी 70 लाख वापरकर्त्यांची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय मिळविली होती, हे फेसबुकने एप्रिल महिन्यात मान्य केले होते. त्याबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अमेरिकी संसद व युरोपीय महासंघाच्या संसदेसमोर माफीही मागितली होती. मात्र या नव्या प्रकरणामुळे कंपनीच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
अॅपल, अॅमॅझोन, सॅमसंग अशा कंपन्यांना उत्पादनांवर फेसबुकचा वापर करणाऱ्यांचे ईमेल पत्ते, फोन क्रमांक आणि वैवाहिक स्थिती, तसेच त्यांच्या मित्रांची माहिती मिळत होती, असा दावा न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे.
“या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे आणि यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे,” असे ऱ्होड आयलंडचे संसद सदस्य डेव्हिड सिसिलीन यांनी म्हटले आहे.
