कथा इजिप्तमधील एका झपाटलेल्या मंदिर-महालाची


इजिप्त हा देश अतिशय प्राचीन संस्कृती आणि त्या संस्कृतीशी निगडित इतिहास असणारा आहे. ज्या व्यक्तींना प्राचीन संस्कृतींचे अध्ययन करण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी इजिप्त ज्ञानाच्या खजिन्यासम आहे. गीझाच्या पिरॅमिडस् पासून इजिप्तच्या देव देवतांशी निगडित प्रत्येक कहाणी अतिशय रोचक आहे. अशीच रोचक कथा आहे कैरो येथील एका मंदिराची. ह्या ठिकाणी एक महाल ही आहे, त्यामुळे ह्या वास्तूचा उल्लेख ‘टेम्पल-पॅलेस’, म्हणजेच मंदिर-महाल असा केला जातो. हा महाल एखाद्या भव्य हिंदू मंदिराप्रमाणे दिसेल असा बनविलेला आहे. त्यामुळे ह्या महालाची रचना इतर तत्कालीन महालांच्या मानाने वेगळी आहेच, पण त्याही पेक्षा अधिक म्हणजे हा महाल झपाटलेला असल्याची स्थानिक लोकांची मान्यता आहे. अश्या ह्या मंदिर-महालाविषयी रोचक माहिती खास ‘माझा पेपर’ च्या वाचकांसाठी.

कैरो शहराचे उपनगर असलेल्या हेलीयोपोलीस भागामध्ये ही भव्य वास्तू उभी आहे. ह्याला ‘क़स्र ऐ बॅरन’ किंवा ‘बॅरन्स पॅलेस’ ह्या नावांनी ओळखले जाते. ह्या ठिकाणी घडणाऱ्या चित्र-विचित्र घटनांमुळे ही वास्तू चर्चेचा विषय ठरत आली असून, १९५० सालापासून ही वास्तू उजाड पडून आहे. ही वास्तू इजिप्शियन कोट्याधीश आणि उद्योगपती बॅरन एदुआर्द एम्पेन ह्यांच्या मालकीची होती. एके काळी ह्या वास्तूची शान, आणि त्यातील वैभव, दृष्टी ठरणार नाही इतके भव्य-दिव्य असे होते. संपत्ती कमविण्याच्या उद्देशाने बॅरन एम्पेन इजिप्तमध्ये आल्यानंतर, आपल्या रुबाबाला साजेलशी वास्तू असावी म्हणून त्यांनी बॅरन्स पॅलेसचे निर्माण करविले.

एम्पेन ह्यांना इजिप्त देश मनापासून आवडला होता. तसेच त्यांना भारतीय वास्तूकला आणि स्थापत्यशास्त्राबद्दलही मनापासून आस्था होती. त्यामुळे १९०७ साली त्यांनी फ्रेंच स्थापत्यविशारद अलेक्झांडर मार्सेल ह्यांना प्रसिद्ध भारतीय मंदिरांच्या रचनेनुसार निवासस्थान बनविण्यास सांगितले. मार्सेल ह्यांनी कंबोडियातील अंग्कोर्वत आणि ओडिशा राज्यातील अनेक सुंदर मंदिरांच्या रचनेवरून प्रेरणा घेत बॅरन एम्पेन ह्यांच्यासाठी महाल उभा करण्यास सुरुवात केली. ह्या महालाचे निर्माणकार्य १९०७ ते १९११ ह्या काळामध्ये झाले. हा महाल उभा करण्याकरिता कॉन्क्रीटचा वापर करण्यात आला. त्या काळी अस्तित्वात असलेल्या इमारतींमध्ये ही इमारत सर्वात सुंदर असल्याचे बोलले जाते.

ही भव्य इमारत दुमजली असून ह्यामध्ये अनेक भव्य दालने, मोठे वाचनालय, आणि अनेक शयनकक्ष होते. तसेच ह्या महालातील प्रत्येक भिंतीवर हिंदू पुराणांतील चित्रे रेखाटली होती. ह्या महालातील प्रमुख टॉवर मंदिराच्या कळसा प्रमाणे दिसणारा असून, हा टॉवर संपूर्ण ३६० अंश गोलाकार फिरत असे. ह्यामुळे ह्या टॉवरच्या प्रत्येक भागामध्ये नैसर्गिक प्रकाश येणे शक्य होते. ह्या भव्य वास्तूमध्ये एम्पेन वंशाच्या काही पिढ्यांनी वास्तव्य केले. पण त्या दरम्यान, अनेक दुर्दैवी घटना ह्या महालामध्ये घडल्या. बॅरन एम्पेन ह्यांची बहिण हेलेना हिचा, ह्या वास्तूतील मुख्य टॉवरमधील गच्चीतून गूढरित्या खाली पडून मृत्यू झाला.

त्यानंतर काही काळाने एम्पेनची मुलगी मिरीयम ही देखील ह्या महालातील लिफ्टमध्ये मृतावस्थेत आढळली. खुद्द बॅरन एम्पेन हे ही १९२९ साली मृत्यू पावले. इतक्या सगळ्या दुर्दैवी घटना एकामागोमाग एक घडल्यानंतर त्याबद्दल गावामध्ये उलट सुलट चर्चा सुरु न होतील तरच नवल होते. मात्र एम्पेन कुटुंबीयांनी ह्या घटनांकडे केवळ योगायोग म्हणून पाहिले आणि ह्या महालातील आपले वास्तव्य कायम ठेवले. १९५२ साली एम्पेन परिवाराने लंडनला स्थलांतर केल्यानंतर हा महाल सौदी गुंतवणूकदारांना विकण्यात आला. पण ह्या महालामध्ये त्यांच्यापैकी कोणीही वास्तव्यास कधीच आले नसल्यामुळे हा महाल बंद राहिला.

महाल वर्षानुवर्षे बंदच असल्यामुळे आणि त्याची देखभाल करणारे कोणीच नसल्याने भुरट्या चोरांना रान आयतेच मोकळे मिळाले. त्यांनी ह्या महालातील लहान मोठ्या अनेक वस्तू चोरून नेल्या. त्याचबरोबर महाल रिकामा असल्याने इथे अनेक भुता-खेतांचे किस्से ही कानी पडू लागले. येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांनी तेथील दालनांमध्ये रक्ताचे ठसे आणि आराश्यांमध्ये चित्र विचित्र आकृती दिसत असल्याचे सांगितले. ह्या भयावह कथांमध्ये अनेकांनी आपापली कल्पनाशक्ती पणाला लावून आणखीनच भर घातली, आणि त्यानंतर भीतीपोटी ह्या महालाकडे चिटपाखरू देखील फिरकेनासे झाले.

अखेरीस १९९० च्या दशकामध्ये ह्या महालचे रुपांतर आलिशान पंचतारांकित हॉटेल व कॅसिनोमध्ये केले जावे अशी योजना होती, पण ती फळाला आली नाही. २००५ साली भारतीय दूतावासाने ही वास्तू खरेदी करण्याची तयारी दर्शविली आणि येथे सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा विचार व्यक्त केला, पण काही कारणाने हे देखील घडून येऊ शकले नाही. अखेरीस ही वास्तू इजिप्शियन सरकारने ताब्यात घेतली आणि २०१७ साली ह्या वास्तूचे नूतनीकरण सुरु झाले. आता येत्या काही वर्षांमध्ये ही वास्तू परत एकदा तिच्या आलिशान रुपात पाहायला मिळण्याची आशा आहे.

Leave a Comment