मध्य प्रदेशातील संशोधकांनी तयार केले केसांपासून खत

माणसाचे जे केस केर-कचरा करतात त्यांच्यापासूनच आता शेतांसाठी खत तयार होणार आहे. तसेच रासायनिक खतांच्या दुष्परिणामांपासून आणि जमीन ओसाड होण्यापासूनही ते वाचविणार आहे. मध्य प्रदेशातील संशोधकांनी मानवी केसांपासून खत तयार केले असून ते शेतकऱ्यांना स्वस्तात मिळणार आहे.

म. प्र. राज्य घनकचरा व्यवस्थापन समितीचे सदस्य इम्तियाज अली आणि कचरा व्यवस्थापनावर काम करणारी संस्था सार्थक यांनी हे खत तयार केले असून ते द्रव स्वरूपात आहे. याला ग्रोथ प्रमोटर असे नाव देण्यात आले आहे. याच्या निर्मितीसाठी भोपाळमधील भानपुर येथे प्रकल्प स्थापन केला जाणार आहे. याची क्षमता दररोज 2 हजार लिटर एवढी असेल. तसेच इंदूरमधील पिपलिया येथे एक प्रकल्प टाकण्यात आला आहे. त्याची रोजची उत्पादन क्षमता 40 लीटर आहे. या एक लिटर खताची किंमत 100 ते 150 रुपये असेल. ते 50 लिटर पाण्यात मिसळल्यास अर्धा ते एक एकर जमिनीवर टाकता येईल.

नागपूर येथे शेळ्या-मेंढ्यांच्या केसांपासून खत बनविण्यात येते. त्याच धर्तीवर म. प्रदेशात मानवी केसांपासून खत बनविण्याचे प्रयत्न करण्यात आले व त्यांना यश आले आहे. या खताला केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे, असे इम्तियाज अली यांनी नई दुनिया वृत्तपत्राला सांगितले.

Leave a Comment