भारतीय मुळाच्या शास्त्रज्ञाने पायदुखी कमी करण्यासाठी तयार केले ‘स्मार्ट सॉक्स’


गरज ही शोधाची जननी असते, हे विधान पुनश्च सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ इंजिनियरिंग मध्ये पीएचडी करीत असलेल्या दीप्ती अगरवाल ह्यांनी पायाचे दुखणे कमी करण्यासाठी स्मार्ट सॉक्स तयार केले आहेत. हे स्मार्ट सॉक्स रुग्णांनी पायामध्ये चढविल्यानंतर त्यांच्या पायांमध्ये असलेल्या वेदना किंवा दुखापत कितपत गंभीर आहे हे कळून येणे फिजियोथेरपिस्टना सोपे जाणार आहे. अगरवाल ह्यांनी तयार केलेल्या स्मार्ट सॉक्सना ‘ सोफी ‘ ( so-phy ) हे नाव देण्यात आले असून, हे मोजे पायांमध्ये सहज घालता येणार आहेत. ह्या मोज्यांमध्ये असलेल्या तंत्रज्ञानामुळे रुग्णाच्या शरीराच्या कंबरेपासून खालच्या भागाच्या हालचालींचे अवलोकन करणे फिजियोथेरपिस्ट ना सहज शक्य होणार आहे.

हे सॉक्स तयार करण्याची कल्पना दीप्ती अगरवाल ह्यांना कशी सुचली, ह्यामागे देखील एक कहाणी आहे. दीप्तीचे वडील उत्तर प्रदेशातील एका लहानशा गावामध्ये राहत असत. त्यांच्या पायाला काही कारणाने दुखापत झाली. पण त्यासाठी उपचार घ्यायचे म्हणजे पैशांची गरज पडणार होती, आणि त्या लहान गावामध्ये उपचार होणे शक्य नसल्याने मोठ्या शहरामध्ये जाऊनच उपचार घ्यावे लागणार होते. आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसल्यामुळे दीप्तीचे वडील उपचार करवून घेऊ शकले नाहीत. वडिलांच्या ह्या दुखण्यातून दीप्तीला स्मार्ट सॉक्स तयार करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामागे उद्देश हा, की जास्त पैसे मोजावे न लागता, रुग्णाच्या शरीराच्या हालचालींचे अवलोकन करून त्यांना झालेली दुखापत कितपत गंभीर आहे ह्याचा नेमका अंदाज डॉक्टरांना येऊ शकतो आणि त्यानुसार रुग्णावर उपचार करता येऊ शकतात.

दीप्तीने तयार केलेल्या स्मार्ट सॉक्स मध्ये तीन ठिकाणी सेन्सर्स लावलेले असून, हे सॉक्स रुग्णाने घातल्यानंतर दोन्ही पायांवर त्याने सम प्रमाणात भार दिला आहे किंवा नाही, त्याच्या पायांची हालचाल कितपत होते आहे, हे समजणे सोपे होणार आहे. ह्यामध्ये पायाची केली गेलेली स्केचेस पाहून स्मार्ट सॉक्सने पुरविलेला इतर डेटा पाहून रुग्णाची ट्रीटमेंट ठरविता येणार आहे. हे सॉक्स घालून रुग्णाला काही विशिष्ट व्यायाम किंवा हालचाली करायला सांगून त्या हालचालींचे अवलोकन करीत स्मार्ट सॉक्स डेटा पुरवितात.

ह्या स्मार्ट सॉक्सचा यशस्वी प्रयोग अगरवाल ह्यांनी रॉयल चिल्ड्रन्स हॉस्पिटल मधील काही रुग्णांवर करून पहिला. त्याद्वारे रुग्णांच्या पायांच्या हालचालींचे पूर्वी कधीही न केले गेलेले अवलोकन, ह्या स्मार्ट सॉक्सच्या मदतीने करता येणे शक्य झाले. ह्यामध्ये रुग्ण प्रत्यक्षात डॉक्टरांच्या समोर नसला, तरी स्मार्ट सॉक्सने रेकॉर्ड केलेला डेटा पाहून त्या रुग्णाची उपचारपद्धती ठरविणे आता शक्य होणार आहे.

Leave a Comment