कच्च्या पपईचे आरोग्यासाठी फायदे


पपई हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त फळ आहे हे आपण जाणतोच, पण त्याचबरोबर न पिकलेली किंवा कच्ची पपईदेखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारी आहे. ह्यामध्ये असलेली जीवनसत्वे आपल्याला अनेक रोगांपासून संरक्षण देतात. कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलड मध्ये वापरून करू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची पपई वरदान ठरते. ह्याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील इंस्युलीनचे प्रमाण वाढविण्याचे काम कच्ची पपई करीत असते. ह्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

अनेक रिसर्चच्या माध्यमांतून हे सिद्ध झाले आहे, की कच्च्या पपईचे सेवन नियमित करणाऱ्यांना कोलन किंवा प्रोस्टेटचे कर्करोग होण्याची संभावना कमी असते. पपईमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस्, फायटो-केमिकल्स, आणि फ्लावेनॉइड्स शरीरामध्ये कर्करोगाच्या कोशिका तयार होण्याला आळा घालतात. कच्ची पपई वजन घटविण्याच्या कामीही सहायक आहे. ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी दररोज भोजनासोबत कच्च्या पपईचे सेवन करावे. ह्याच्या सेवनाने शरीरामध्ये साठलेल्या अतिरिक्त चरबीचा निचरा होतो. कच्च्या पपईचे सेवन करण्यासाठी कच्ची पपई किसून घेऊन तो कीस दह्यामध्ये घालून खाल्ला जाऊ शकतो. कच्च्या पपईचे सेवन सॅलडसोबतही केले जाऊ शकते.

जर युरीन इन्फेक्शनची समस्या असेल, तर त्यासाठी कच्ची पपई लाभदायक आहे. कच्च्या पपईने इन्फेक्शन रोखले जाऊन ते निर्माण करणाऱ्या बॅक्टेरीयांनाही आळा बसतो. जर सांधेदुखी सतावत असेल, तर ती कमी करण्यासाठी कच्ची पपई लाभकारी आहे. ह्यासाठी दोन लिटर पाणी उकळून घ्यावे. कच्ची पपई धुवून घेऊन, ती चिरावी आणि त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर पपई चिरून ती पाण्यामध्ये पाच सात मिनिटे उकडवून घ्यावी. त्यानंतर ह्यामध्ये दोन चमचे ग्रीन टी घालून हे पाणी आणखी थोडा वेळ उकळू द्यावे. त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी थोडे निऊ द्यावे. निवल्यानंतर हे पाणी गाळून घेऊन एका घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावे. दिवसभर थोडे थोडे करून हे पाणी पीत राहावे.

कच्च्या पपईच्या सेवनाने लिव्हर देखील निरोगी राहते. तसेच ज्या महिला आपल्या नवजात अर्भकांना स्तनपान करवीत असतील, त्यांच्यासाठी देखील कच्च्या पपईचे सेवन चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात. तसेच शरीरामध्ये कमी तयार होणाऱ्या एन्झाइम्सची तूट भरून काढून आईचे दुध वाढविण्यास कच्ची पपई सहायक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment