व्हँपायर फेशियल बद्दल तुम्ही ऐकले आहे का?


आजकाल चेहऱ्याचे सौंदर्य, तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक तऱ्हेच्या ब्युटी ट्रीटमेंटस् बद्दल, फेशियल्स बद्दल आपण ऐकत असतो. अनेक तऱ्हेची नैसर्गिक किंवा कृत्रिम तत्वे वापरून ही फेशियल्स केली जात असतात. पण ह्या सगळ्या फेशियल करण्याच्या पद्धतींच्या यादीमध्ये सध्या ‘व्हँपायर फेशियल’ ही पद्धतही समाविष्ट झाली आहे, आणि लोकप्रियही होत आहे. व्हँपायर म्हणताच आपल्याला भयपटातील रक्तपिपासू ड्रॅक्युला आठवतात. त्यामुळे त्याच नावाचे हे फेशियल नेमके आहे तरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच हे व्हँपायर फेशियल नेमके काय आहे, हे जाणून घेऊ या.

ह्या ट्रीटमेंटला ‘फेस पी आर पी ‘ असे ही म्हटले जाते. ‘पी आर पी’ म्हणजे प्लेटलेट रिच प्लास्मा. ह्या पद्धतीमध्ये रक्तातील प्लेटलेट्स ज्यामध्ये असतात, ते सिरम रक्तातून काढून घेऊन ते त्वचेमध्ये इंजेक्ट केले जाते. प्लेटलेट्स कोशिका निर्माण होण्याची गती वाढवितात आणि त्वचेमध्ये कोलाजेन निर्मिती वाढवितात. त्वचेमध्ये कोलाजेन वाढले, की त्वचा नितळ, आणि सुरकुत्या विरहित दिसू लागते. त्वचेवर तारुण्याचा तजेला येतो. रक्तातून काढून घेतलेल्या पी आर पीला त्वचेवर निरनिरळ्या पद्धतीने लावले जाते. ह्याची सर्वसामान्य पद्धत, अगदी लहान इंस्युलीन सिरींजचा वापर करणे, किंवा डर्मारोलरचा वापर करणे, ही आहे.

त्वचेवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेचे काही ना काही फायदे आणि तोटे असतातच. त्याचप्रमाणे ह्या पद्धतीचेही आहेत. ह्या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा हा, की ह्यामुळे त्वचा लगोलग तरुण, नितळ, कसलेली दिसू लागते. त्वचेवरील खुली रंध्रे बंद करण्याचे, डाग हटविण्याचे, आणि अगदी बारीक बारीक सुरुकुत्या देखील नाहीशा करण्याचे काम हे फेशियल करते. ह्याचबरोबर त्वचेवर पिगमेंटेशन मुळे आलेले काळे डाग घालविणे देखील ह्या फेशियल ट्रीटमेंटमुळे शक्य होते. ह्या ट्रीटमेंटचे फारसे तोटे नसले, तरी हे फेशियल करविताना आणि केल्यांनतर त्वचेच्या साफ सफाईची काळजी घेणे अगत्याचे आहे, अन्यथा इन्फेक्शन होण्याचा धोका उद्भवितो. तसेच ही फेशियल पद्धती थोडीशी वेदना देणारी ही आहे. ह्या फेशियलची किंमत दहा हजार रुपये असून, हर तऱ्हेच्या त्वचेला साजेल अशी हे ट्रीटमेंट आहे.

Leave a Comment