
बर्लिनची भिंत जमीनदोस्त होऊन पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आल्याला आता तीस वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. पण इतका कालावधी उलटून गेल्यानंतरही जर्मनीतील एक गाव मात्र आजही विभाजित आहे. म्योडलारॉइथ हे गाव अवघ्या पंधरा वीस घरांचेच, पण हे गाव पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये विभाजित असून, आज ही येथे दोन वेगळे नगराध्यक्ष आहेत. येथे दोन्हीकडे बोलली जाणारी भाषा जरी जर्मन असली, तरी दोन्हीकडच्या भाषांची धाटणी वेगळी आहे. इतकेच काय, तर ह्या दोन्ही भागांचे फोन डायलिंग कोड देखील वेगळे आहेत.

१८१० सालापासून वसलेले हे गाव बेव्हेरीया आणि थ्युरीन्जीया ह्या दोन जर्मन राज्यांच्या हद्दींवर होते. दोन राज्यांच्या हद्दींवर असूनही, म्हणावे तसे औपचारिक विभाजन ह्या गावामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत झाले नव्हते. पण त्यानंतर मात्र जर्मनी देश दोन निरनिराळ्या सत्तांच्या ताब्यात गेला. सोव्हियत संघाने पूर्व जर्मनी ताब्यात घेतला, तर पश्चिम जर्मनीवर अमेरिकेचे अधिपत्य राहिले. हे विभाजन झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम जर्मनी वेगळे करण्यासाठी भली थोरली भिंत उभारली गेली. भिंतीचा दोन्ही बाजूला पहारे बसविले गेले, गारद कक्ष उभारले गेले, सशस्त्र सैनिकांची गस्त सरू झाली. म्योडलारइथ हे गाव दोन राज्यांच्या हद्दीवर असल्याने, ह्या गावाची देखील पूर्व-पश्चिम भागांमध्ये विभाजन झाले, आणि हे गाव ‘लिटल बर्लिन’ म्हणून ओळखू जाऊ लागले.
जर्मनीच्या एकत्रीकरणानंतरही हे गाव मात्र अजूनही विभाजित
आजच्या काळामध्ये ह्या गावामध्ये विभाजनाच्या हेतूने उभारलेल्या भिंतीचा केवळ एक लहानसा हिस्सा ह्या गावामध्ये उभा असला, आणि पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले असले, तरी हे गाव आजही विभाजितच आहे. अभिनव जर्मनी देशातील हे एक अजब गाव म्हणता येईल. ह्या एकाच गावाचे दोन भाग असून, दोन्ही कडचे पोस्टल कोड्स, डायलिंग कोड्स देखील वेगळे आहेत. म्हणजेच गावाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये फोन करायचा झाला, तर चक्क लॉंग डीस्टन्स कॉल करावा लागतो ! दोन्ही भागांतील मुलांकरिता त्या त्या भागांमध्ये वेगळ्या शाळा आहेत. बाहेरून जर पर्यटक येथे आले, तर ह्या छोट्याश्या गावाच्या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळ्या धाटणीची भाषा त्यांना ऐकायला मिळते.

जर्मनी देशाप्रमाणे ह्या गावाचे देखील एकत्रीकरण केले जावे का असे येथील रहिवाश्यांना विचारता, दोन्ही बाजूंच्या रहिवाश्यांनी एकत्रीकरण मान्य नसल्याचे सांगितले. पण आता ह्या दोन्हीकडील लोकांमध्ये एकत्रितपणाची भावना वाढत असलेली पहावयास मिळत आहे. आता सार्वजनिक कार्यक्रमांसाठी दोन्ही भागांतील लोक थ्युरिन्जेन भागाकडे असलेल्या सभागृहामध्ये एकत्र येतात. १९५२ साली थ्युरीन्जेन कडील गावाच्या भागावर सोव्हियेत संघाचा ताबा होता, तर बेव्हेरीया कडील गावाचा भाग अमेरिकेच्या ताब्यात होता. एका भागातून दुसरीकडे ये-जा होऊ नये ह्या करिता मध्ये भिंत उभारण्यात आली होती. ह्या भिंतीचे निर्माण, ‘बर्लिन वॉल’ उभी राहिल्यानंतर, १९६१ साली करण्यात आले होते. पण विभाजित बर्लिन मध्ये ज्या प्रकारचे आयुष्य लोक जगत होते, तशी अवस्था ह्या गावामध्ये नव्हती.

बर्लिनमध्ये एका भागामध्ये राहणाऱ्यांना दुसरीकडे कोण आहे ह्याबद्दल काहीही माहिती नसे. मात्र ह्या गावामध्ये दोन्ही भागांमध्ये राहणाऱ्या लोकांचा एकमेकांशी चांगला परिचय होता. किंबहुना जेव्हा एका भागातून दुसरीकडे गुप्तहेर पाठविण्यात आले, तेव्हा, ते आपल्या गावातील लोक नाहीत हे ग्रामस्थांनी बरोबर ओळखून त्यांना कशाचाही थांग पत्ता लागू दिला नाही. नोव्हेंबर १९८९ मध्ये बर्लिन वॉल जमीनदोस्त केली गेल्यानंतर ह्या गावातील ग्रामस्थांनी देखील गावातील भिंत हटविण्याबद्दल तत्कालीन नगराध्यक्षांना विनविले. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये दोन्ही भागांना वेगळे करणारी भिंत पुष्कळ अंशी पाडली गेली, आणि ग्रामस्थ एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी स्वतंत्र झाले. आज ह्या विभाजनाचा इतिहास सांगण्यासाठी ह्या भिंतीचा केवळ एक लहानसा हिस्साच मात्र अस्तित्वात आहे. आता ह्या गावातील ओपन एअर थियेटर येथे आहे.
