या सेलिब्रिटीजनी अपंगत्वावर मात करीत मिळविले यश


ह्या सेलिब्रिटीजचा आयुष्यपट आणि त्यांच्या यशोगाथा सर्व सामान्यांना अतिशय प्रेरणा देणाऱ्या आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंग असूनही ह्या सेलिब्रिटीजनी यशाची शिखरे सर केली. त्यांची ही वाटचाल सोपी खचितच नव्हती, पण तरीही हार न मानता ह्यांनी आपल्या महत्वाकांक्षा जपल्या, आणि अथक प्रयत्नांनी त्या साध्य ही केल्या. शारीरिक दृष्ट्या कमकुवत असूनही ह्या व्यक्तींनी आपल्या अपंगत्वाने खचून न जाता, जिद्दीने त्यावर मात करीत आपल्या आयुष्याची ध्येये साध्य केली आहेत. ह्यांच्याकडून आपल्या सर्वांनाच खूप काही शिकण्यासारखे आहे.

अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन ह्यांचा जन्म केरळ राज्यातला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी एका अपघातामध्ये सुधा ह्यांना एक पाय गमवावा लागला. पण ह्यामुळे खचून न जाता सुधा ह्यांनी ‘जयपूर फुट’ लावून घेऊन त्यानंतरही त्यांची नृत्याराधना चालू ठेवली, आणि भारतातील प्रथितयश नृत्यांगना म्हणून लौकिक मिळविला. सुधा चंद्रन ह्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. नृत्यकलेकरिता आणि अभिनयक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीनिमित्त त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. बॅडमिन्टनपटू गिरीश शर्मा ह्याने लहानपणी एका ट्रेन अपघातात आपला पाय गमविला होता. पण हे अपंगत्व त्याला उत्तम बॅडमिन्टनपटू होण्यापासून रोखू शकले नाही. गिरीशला जरी एकच पाय असला, तरी तो एकच पाय इतका कणखर आहे, की त्याच्या जोरावरच गिरीश बॅडमिन्टन उत्तम खेळू शकतो.

शेखर नाईक डोळ्यांनी अंध असले, तरी हे अपंगत्व त्यांनी आपल्या कामगिरीच्या आड कधीच येऊ दिले नाही. टी ट्वेंटी ब्लाइंड वर्ल्ड क्रिकेट प्रतियोगितेमध्ये सहभागी झालेल्या शेखरच्या नावे सर्वाधिक, बतीस सेंच्युरीज चा विक्रम आहे. अनेक आर्थिक अडचणी आणि त्याच्या भरीला अंधत्व असतानाही शेखर ने मोठ्या धीराने आणि जिद्दीने ही वाटचाल पूर्ण केली आहे. त्यांच्याप्रमाणेच तामिळनाडू च्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या क्रीकेट संघाची कप्तान असलेली प्रीती श्रीनिवासन, पोहोताना झालेल्या अपघातामुळे अधू झाली. पण त्याने खचून न जाता, तिच्या ‘सोल फ्री’ नामक संस्थेच्या मार्फत प्रीती, तिच्याप्रमाणेच अपंग असलेल्या महिलांना आधार देण्याचा प्रयत्न करीत, त्यांना त्यांच्या अपंगात्वर मात करून त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी शक्य तितकी मदत, आणि प्रेरणा देते.

साईप्रसाद विश्वनाथन ह्यांचे कंबरेखालील शरीर लहान वयातच पांगळे झाले. पण हे अपंगत्व आपल्या महत्वाकांक्षेच्या आड न येऊ देता, त्यांनी भारताचे पहिले अपंग स्काय डायव्हर म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदविले. त्यांनी १४,००० फुटांच्या उंचीवरून स्काय डायव्हिंग करून हा विक्रम नोंदविला. त्यानंतर त्यांनी ‘सहस्र’ नामक संस्थेची स्थापना केली. अपंग व्यक्तींना शिष्यवृत्ती देऊन त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा साध्य करण्यास मदत करण्याचे काम ही संस्था करीत असते. तसेच ह्या व्यक्तींना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास त्या कामी देखील ही संस्था मदत करते.

राजस्थान मधील एका निर्धन परिवारामध्ये जन्मलेले अकबर खान, जन्मतः अंध होते. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये बालपण घालविलेल्या अकबर खान ह्यांनी आपल्या थोरल्या भावाच्या आग्रहाखातर आपले शिक्षण पूर्ण केले. अकबर खान ह्यांना गायन उत्तम अवगत असल्याने त्यांना अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली. कालांतराने अकबर खान ह्यांनी गायनक्षेत्रात भरघोस प्रसिद्धी आणि यश मिळविले. १९८९ साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अरुणिमा सिन्हाने ट्रेनमध्ये काही गुंडांचा प्रतिकार करताच, त्यांनी तिला चालत्या ट्रेनमधून ढकलले. ह्यामध्ये अरुणिमाला आपला पाय गमवावा लागला. त्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीने एक पाय गमाविल्यानंतरही अरुणिमा, जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी, पहिला अपंग महिला ठरली. अपंगत्व आले, म्हणून लोकांची दया, सहानुभूती अरुणिमाला मान्य नव्हती. जर मनाने ठरविले, तर अपंग व्यक्ती देखील अशी कामे करू शकतात, जी धडधाकट व्यक्तींनाही सहज जमणार नाहीत, असे म्हणणाऱ्या अरुणिमाने आपल्या जिद्दीच्या जोरावर एव्हरेस्ट सर करण्यासारखी अतिशय कठीण कामगिरी पार पाडली.

Leave a Comment