पावलांवर आणि टाचांवर सतत सूज येत असल्यास... - Majha Paper

पावलांवर आणि टाचांवर सतत सूज येत असल्यास…


पायांवर किंवा पावलांवर सूज येणे ही सामान्यपणे खूप लोकांमध्ये आढळणारी समस्या आहे. अयोग्य जीवनशैली, अपरिपूर्ण आहार, व्यायामाचा, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा, ह्या आणि अश्या अनेक कारणांमुळे पावलांवर आणि टाचांवर सूज आलेली पहावयास मिळते. तसेच जास्त काळ उभे राहिल्याने, किंवा जास्त काळ एकाच जागी बसल्याने देखील पावलांवर सूज येते. तसेच वयस्क व्यक्ती, गर्भारशी महिला, ह्यांच्या ही पायांवर सूज दिसून येते. जर शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत होत नसेल, तर त्यामुळे पावलांवर सूज येऊ शकते. महिलांच्या बाबतीत, ज्यांची मासिक पाळी कायमची बंद होणार असेल, म्हणजेच ज्या महिला मेनोपॉझ ह्या अवस्थेत असतील, त्यांच्या पावलांवर सूज दिसून येते.

पावलांवर सूज येणास सुरुवात झाली, की त्यासोबत पावलांवर लाली येणे, चालताना पावलांमध्ये वेदना होणे, सूज आल्याने चप्पल किंवा बूट घट्ट होत गेल्यामुळे अस्वस्थ वाटणे अश्या तक्रारीही सुरु होतात. पावलांवरील सूज कमी करण्यासाठी काही उपाय अवलंबता येतील. सर्वप्रथम जर पायांवर सूज असेल. तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. जर पावलांवर सूज येत असेल, आणि त्यासोबत वेदनाही होत असतील, तर बादलीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये एप्सम सॉल्ट घालावे, आणि त्यामध्ये पावले बुडवून शेक घ्यावा. आठवड्यातून तीन दिवस, वीस मिनिटांसाठी हा उपाय अवश्य करावा.

जर आहारामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असेल, तर त्यामुळे शरीरामध्ये फ्लूईड रिटेन्शन सुरु होते, आणि त्यामुळेही पावलांवर सूज येऊ लागते. त्यामुळे जेवणासाठी जे पदार्थ केले आहेत त्यांमध्ये असलेले मीठ वगळता, वरून मीठ घालून घेण्याची सवय टाळावी. विशेषतः सॅलड, किंवा भातावर वरून मीठ घालणे टाळावे. मीठ अधिक असलेले पदार्थ, म्हणजे पापड, लोणची कमी प्रमाणात खावीत. तसेच प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये मीठ जास्त असल्याने त्यांचे सेवनही मोजक्या प्रमाणात करावे.

शरीरामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाल्याने देखील पावलांवर सूज येऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. त्यासाठी हिरव्या ताज्या पालेभाज्या, सुकामेवा, मासे, सोयाबीन, अवोकाडो, केळी, आणि डार्क चॉकोलेट ह्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा. तसेच पावलांना खोबरेल तेलाने, किंवा कडूनिंबाच्या तेलाने, अथवा बदामाच्या तेलाने मालिश केल्याने पावलांकडील रक्ताभिसरण व्यवस्थित होते, आणि त्यामुळे पावलांवरील सूज कमी होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी पावलांना मालिश केल्याने फायदा होतो.

अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये पोटॅशियम मुबलक मात्रेमध्ये आहे. त्यामुळे शरीरात साठून राहिलेल्या फ्लुइडस् चा निचरा होण्यास मदत होते. ह्यासाठी एका भांड्यामध्ये समप्रमाणात गरम पाणी आणि अॅपल सायडर व्हिनेगर घ्यावे. त्यामध्ये एक साफ टॉवेल बुडवून, पिळून घेऊन, त्या गरम टॉवेलने पावले शेकून काढावीत. तसेच दिवसातून दोन वेळा एक मोठा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर एक ग्लास गरम पाण्यातून घेतल्यानेही फायदा होतो. त्याचप्रमाणे रात्री दोन चमचे धणे पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी हे पाणी धण्यासकट अर्धे राहीपर्यंत उकळावे. त्यानंतर हे पाणी थोडे कोमट झाले, की रिकाम्या पोटी प्यावे. त्याने ही पायांवरील सूज कमी होण्यास मदत होते. आले घालून उकळलेले पाणी, किंवा पार्सले घालून उकळलेले पाणीही पायांवरील सूज कमी करण्यास सहायक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment