क्षणभर मनाचा गोंधळ उडवून टाकेल असे हे छायाचित्र


इंटरनेटवर सध्या व्हायरल होत असलेले हे छायाचित्र पाहिले की, आपली नजर देखील कधी तरी आपली फसवणूक करू शकते, हे तुम्हाला नक्कीच पटेल. २४ मे रोजी ट्वीटर वर शेअर झालेल्या ह्या छायाचित्राने खरोखर धमाल उडवून दिली. ज्याने कोणी हे छायाचित्र पाहिले, त्याच्या मनाचा क्षणभर का होईना, पण नक्कीच गोंधळ उडाला. ह्या छायाचित्रामध्ये एक तरुण आणि एक तरुणी एकमेकांना आलिंगन देताना दिसत आहेत. आपण हे छायाचित्र पाहिल्यानंतर ह्यामध्ये तरुण कुठे उभा आहे, आणि तरुणी कुठे उभी आहे हे चटकन लक्षात न आल्यामुळे हे छायाचित्र पाहणाऱ्याचा गोंधळ उडत आहे.


हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याच्या केवळ पाचच दिवसांमध्ये ह्याला तब्बल एक लाखाच्या वर ‘लाईक्स’ मिळाले असून, ४५,००० ‘शेअर्स’ देखील मिळाले आहेत. ह्या छायाचित्रामध्ये संबंधित तरुण खुर्चीमध्ये बसलेला असून तरुणी त्याला आलिंगन देताना दिसत आहे. पण ह्यांची स्थिती किंवा पोझिशन अशी काही विचित्र आहे, की कुठले डोके तरुणाचे आणि कुठले तरुणीचे हा संभ्रम निर्माण होतो. ‘आधी त्या तरुणानेच हाय हील्स घातले आहेत की काय असेच वाटले’, अशी एक प्रतिक्रिया ट्वीटर वर, हे छायाचित्र ज्याने प्रथम शेअर केले त्या व्यक्तीकडून पाहायला मिळाली.


हे छायाचित्र पाहून अनेकांचा गोंधळ उडाला. ट्वीटर वर आलेल्या अनेक प्रतिक्रियांच्या माध्यमातून हे सिद्ध झाले. तरुणानेच हील्स घातल्या असाव्यात असे वाटून जरा मन गोंधळले असल्याची कबुली काहींनी ट्वीटरवर दिली, तर काहींनी हे छायाचित्र वास्तविक कसे आहे हे ट्वीटरवर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एका ट्वीटर युजरने तर हे छायाचित्र पाहणाऱ्याला व्यवस्थित समजावे ह्या करिता छायाचित्रावर दोन निरनिराळे रंग वापरून आकृती देखील बनवून टाकल्या.

मनाचा अश्या प्रकारे गोंधळ उडवून टाकणारे ट्वीटर वरील हे एकमेव छायाचित्र नाही. ह्या पूर्वी सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने प्रसिद्ध केलेल्या ‘मिरर सेल्फी’ ने ही अशीच धमाल उडवून दिली होती. तसेच चमचमणारे पाय दाखवणारी एक सेल्फी देखील अशीच व्हायरल झाली होती.

Leave a Comment