देशाचे धूम्रपानामुळे होते १,८१,८६९ कोटी रुपयांचे नुकसान


मुंबई :- टोबॅको अॅटलासने केलेल्या सर्वेक्षणाअंती जाहीर झालेल्या अहवालात देशात ६.२५ लाख मुले दररोज धूम्रपान करत असल्याचे समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तंबाखू व सिगारेट सर्वत्र सहजपणे व स्वस्त उपलब्ध होत असतात. भारतात सिगारेट सुट्या स्वरुपातही विकल्या जातात. देशाचे धूम्रपानामुळे १,८१,८६९ कोटी रुपयांचे नुकसान होते. आरोग्य सुधारण्यावर झालेला थेट खर्च आणि उत्पादकता कमी झाल्यामुळे होणारा अप्रत्यक्ष खर्च यांचा यात समावेश आहे.

३१ मे हा दिवस जगभरात सर्वत्र जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळला जात आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती या दिवशी करणे आवश्यक आहे. तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी ७० लाख जणांचा मृत्यू होतो. यातील १० लाख जण विकसनशील देशांतील असतात. दर सहा सेकंदांनी भारतात एकजण तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या रोगांना बळी पडतो. प्रौढांच्या तंबाखूसेवनाविषयीच्या जागतिक सर्वेक्षणानुसार, तंबाखू सेवनाचे प्रमाण भारतात प्रचंड असून भारतातील २७.५ कोटी म्हणजे एकुण ३५ टक्के लोक कोणत्या तरी तंबाखूचे सेवन करत असतात. आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

हृदयविकार, पक्षाघात, फुफ्फुसाचे रोग, महिलांच्या गरोदरपणात समस्या, तसेच अनेक प्रकारचे कर्करोग तंबाखूच्या सेवनामुळे होत असतात. सध्याची परिस्थिती व आकडेवारी पाहता, महिला देखील धूम्रपान करणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने आहेत. ही घातक सवय मुलांनाही पटकन लागलेली दिसते. या घातक सवयीपासून लहान मुले, तरुण-तरुणी यांना दूर ठेवण्यासाठी तातडीने उपाय योजायला हवेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment