गाई-म्हशीच्या दुधापेक्षा झुरळाचे दुध अधिक पौष्टिक?


घरामध्ये एक जरी झुरळ दिसले, तर झुरळांचा प्रादुर्भाव घरभर होण्याआधीच सुचेल त्या उपायांनी झुरळे नाहीशी करण्याच्या प्रयत्नांत आपण असतो. निरनिराळे स्प्रे, कीटकनाशके, पेस्ट कंट्रोल अश्या अनेक आयुधांनी आपण सज्ज होतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये एकही झुरळ पुनश्च दृष्टीस पडू नये. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास एकही झुरळ दृष्टीस पडू नये, झुरळांचा प्रादुर्भाव म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण, असे जरी आपण म्हणत असलो, तरी वैज्ञानिकांच्या मते झुरळे, हे भविष्यातील ‘सुपर फूड ‘ ठरणार आहेत. वैज्ञानिकांच्या मते झुरळांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा, दुधाप्रमाणे दिसणारा स्राव निर्माण होतो, जो मानवी शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ह्या बाबतचे वृत्त नुकतेच ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हे शोधकार्य ‘इंस्टीट्युट फॉर स्टेम सेल बायोलॉजी अँड रीजेनेरेटिव्ह मेडिसिन ‘ ह्या भारतीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी केले आहे. ह्या वैज्ञानिकांच्या मते एका विशिष्ट प्रजातीच्या झुरळाच्या शरीरातून स्रवणारे दुधासम दिसणारे कण मानवी शरीरासाठी वरदान ठरू शकतात. हा स्राव ‘पॅसिफिक बीटल कॉकरोच’ ह्या प्रजातीच्या झुरळामध्ये दिसून आला असून, ऑस्ट्रेलियामध्ये ह्या झुरळाची प्रजाती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ह्या स्रावाला ‘ कॉकरोच मिल्क’, म्हणजेच झुरळाचे दुध असे नाव देण्यात आले असून, या दुधाची पौष्टिकता इतर जनावरांपासून मिळणाऱ्या दुधापेक्षा कतीत तरी पटींनी अधिक असल्याचे समजते.

गाई-म्हशींकडून मिळणाऱ्या दुधामध्ये जितकी पोषक तत्वे असतात, त्या पेक्षा तीनपट आशिक पोषक तत्वे ह्या कॉकरोच मिल्क मध्ये असल्याचे वैज्ञानिक म्हणतात. ह्या दुधामध्ये अमिनो अॅसिड्स, प्रथिने मोठ्या प्रमाणावर असून, हे दुध भविष्यातील ‘सुपर फूड’ बनू शकतील असा दावा वैज्ञानिक करीत आहेत. त्यांच्या शोधानुसार ह्या दुधामध्ये प्रथिने, फॅटस्, आणि नैसर्गिक शुगर्स आहेत. तसेच मानवी शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारी सर्व अमिनो अॅसिड्स ह्यामध्ये आहेत, असे ह्या शोधकार्याशी संबंधित वैज्ञानिक संचारी बॅनर्जी ह्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

हे शोधकार्य २०१६ साली प्रसिद्ध करण्यात आले असले, तरी वास्तवात ह्या कॉकरोच मिल्कचा वापर करून पाहण्याची तयारी अलीकडेच पाहायला मिळत आहे. किंबहुना आता केवळ हे दूधच नाही, तर ह्या दुधापासून तयार केलेले आईसक्रीम देखील विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समजते. ‘गोर्मे ग्रब’ नामक साउथ अॅफ्रिकन कंपनी ‘एन्टोमिल्क’ ह्या नावाखाली, विशिष्ट कीटकांपासून तयार केलेले दुध विकत आहे. ह्या कीटकांची पैदास खास ह्या दुधाकरीताच केली जात असल्याचे समजते. हे दुध अधिक काळ टिकणारे, चविष्ट, लॅक्टोज फ्री आणि अत्यंत कमी कॅलरी असणारे आहे असा दावा कंपनीने केला आहे. हे दुध प्रथिने, लोह, झिंक आणि कॅल्शियम ह्यांनी परिपूर्ण आहे.

झुरळापासून मिळणाऱ्या दुधामध्ये मानवी शरीराला पोषक अशी तत्वे मोठ्या प्रमाणावर असली, तरी ह्या दुधाचे सेवन मानवी शरीरासाठी अपायकारक ठरू शकते किंवा नाही ह्याबाबत कोणतेही खात्रीपूर्वक विधान वैज्ञानिकांच्या द्वारे केले गेलेले नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment