
आसामच्या गुवाहाटी पासून ८० मैलावर आणि गोलपारा पासून अगदी जवळ असलेला सूर्य पहाड म्हणजे अध्यात्मिक महत्वाची प्राचीन जागा असून १ ल्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंत हा परिसर गजबजलेला होता. त्यानंतर विराण पडलेल्या या जागी पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून पुरातत्व विभागाने येथे केलेले उत्खनन अनेक सुंदर शिल्पे जमिनीतून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरले आहे.
गोलपारा जवळील सूर्य पहाड

सूर्य पहाड नावावरून हे सूर्याच्या उपासनेचे, पूजेचे स्थान असावे याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या भाविकांना हे स्थळ पवित्र होते असे येथील शिल्पे, कोरीव काम आणि मंदिर, मठ, स्तूप याच्या बांधकामवरून सहज कळते. येथे असलेल्या पंचायतन मंदिरात मुख्य पूज्य देवता सूर्य प्रतिमा असून अन्य मूर्तीत विष्णू, गणेश, महिषासुरमर्दिनी म्हणजे दुर्गा याच्या मूर्ती आहेत. ग्रॅनाइटचा खडकांवर अक्षरशः हजारोनी शिवलिंगे कोरली गेली आहेत.

२० व्या शतकात येथे एक छोटे सूर्यमंदिर बांधले गेले असून दरवर्षी माघी पौर्णिमेला येथे मोठा उत्सव साजरा होतो. त्यासाठी देशविदेशातून हजारो भाविक येथे येतात. पुरातत्व विभागाने उत्खननात मिळालेल्या वस्तू, मूर्तींचे एक संग्रहालय तयार केले आहे.
