‘या’ गाण्यामुळे मानसिक कमी होतो तणाव; मनोवैज्ञानिकांचा दावा


मानसिक तणाव, किंवा नैराश्य हा विकार बरा करण्यास अतिशय कठीण असा विकार समजला जातो. मानसिक तणावामध्ये असलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये अनेक तऱ्हेच्या भावना निर्माण होत असतात. कधी भीती, कधी संताप, कधी चिंता तर कधी नैराश्य- अश्या अनेक भावनांचे खेळ ह्या व्यक्तींच्या मनामध्ये सतत सुरु असतात. दुर्दैवाने मानसिक तणावाखाली जगत असणाऱ्यांची संख्या जगभरामध्ये झपाट्याने वाढत आहे. ह्यामध्ये लहान मुले आहेत, तरुण वर्ग आहे, कामकाजी महिला-पुरुष आहेत, गृहिणी आहेत, वृद्ध मंडळीही आहेत, किंबहुना समाजातील एकही वर्ग किंवा एक ही वयोगट असा नाही ज्यामध्ये मानसिक तणावाखाली असणाऱ्या व्यक्ती पाहायला मिळत नाहीत. अमेरिकेतील ‘अँग्झायटी सेंटर’ ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील, १८-५४ वयोगटातील सुमारे तीस टक्के जनता मानसिक तणावाखाली जगत आहे.

आजच्या प्रगत युगामध्ये झपाट्याने वाढत चाललेले तंत्रज्ञान आणि त्यापायी परस्परांशी कमी होत चाललेला संवाद, मुलांच्या प्रती पालकांची अनेक बाबतीत अनाठायी असलेली भीती आणि त्यापायी मुलांना जास्त जपले जाणे, मुलांच्या बाबतीत, तसेच नोकरदार-व्यावसायिकांच्या बाबतीत उत्तम कामगिरी करीत राहण्याचे प्रेशर, ह्या आणि अश्या अनेक कारणांपायी मानसिक तणाव वाढत आहे. तसेच आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर किंवा आपल्या प्रत्येक हालचालीवर आपल्या अवती-भोवती असणाऱ्यांचे लक्ष असल्याने आपण कुठे चुकत तर नाही, ही सततची भीती मानसिक तणावामध्ये भर घालणारी असते. मानसिक तणावाला मनोवैज्ञानिक, ‘ सायलेंट किलर ‘ म्हणतात. ह्यामागे कारण असे, की आपल्या मनावर असलेल्या तणावाबद्दल मनमोकळेपणाने बोलले जात नाही. तसेच मानसिक तणावाखाली वावरणाऱ्या व्यक्तींना अगदी काळजीपूर्वक वागविण्याची गरज असते. मनोविज्ञानामध्ये अश्या केसेस हाताळण्यासाठी निरनिराळ्या उपचार पद्धती अवलंबिल्या जातात.

ह्या उपचारपद्धतींमध्ये काऊन्सेलिंग हा सर्वात जास्त स्वीकारला जाणारा पर्याय आहे. काही केसेसच्या बाबतीत औषधोपचार ही करण्याची आवश्यकता भासते. अमेरीकेमध्ये अँटी डिप्रेसंट औषधे घेणाऱ्यांचा आकडा स्तिमित करणारा आहे. उत्तर अमेरिकेतील ६५ टक्के लोक अँटी डिप्रेसंट औषधे घेतात, तर ४३ टक्के लोक ‘मूड रेग्युलेटर’ औषधांचा वापर करतात. हे आकडे काळजी करायला लावणारे आहेत. ह्या शिवाय अलीकडच्या काळामध्ये आणखी एक उपचारपद्धती अतिशय लोकप्रिय होत आहे, ती म्हणजे ‘ म्युझिक थेरपी’. त्यातही एका विशिष्ट गाण्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होत आहे असा दावा युनायटेड किंगडम मधील न्युरोसायंटीस्टस् करीत आहेत.

‘मिनीलॅब इंटरनॅशनल’ च्या डॉक्टर डेव्हिड लुईस हॉजसन आणि त्यांच्या टीमने ह्या संबंधी रिसर्च केला आहे. त्यांच्या मते ‘वेटलेस’ नामक ‘ मार्कोनी युनियन’ ह्यांनी तयार केलेले गीत ऐकल्यानंतर मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींच्या मनावरील ताण पुष्कळ अंशी कमी झाल्याचे निदान करण्यात आले आहे. हा ताण इतका कमी झाला की पेशंटस् ना चक्क शांत झोप लागली. त्यामुळे हे गीत गाडी चालविताना ऐकू नये असा इशारा डॉक्टर हॉजसन आणि त्यांच्या टीम तर्फे देण्यात आला आहे. मार्कोनी युनियन ह्यांनी ह्या गाण्याची निर्मिती करताना साउंड थेरपिस्टस् ची मदत घेतली होती. हृदयाचे ठोके तणावामुळे जलद पडत असतील, तर त्यांची गती कमी व्हावी, रक्तदाब कमी व्हावा, आणि तणाव कमी व्हावा अश्या उद्देशाने हे गाणे तयार करण्यात आले असून, ह्या गाण्याचे उद्देश सफल होत असल्याचे दिसून येत असल्याचे डॉक्टर हॉजसन आणि त्यांच्या टीमने सिद्ध केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment