प्रेयसीला सर्वात महाग ‘बुके’ भेट देणारा प्रेमवीर


प्रेमाची धुंदी जेव्हा डोक्यावर चढते, तेव्हा प्रेमवीर आपल्या प्रेयसींसाठी चंद्र तारे आकाशातून तोडून आणण्याचे वायदे करीत असलेले अनेकदा पाहायला मिळतात. आपल्या प्रेमापुढे पैशाची काही किंमत न वाटणारे प्रेमवीर आपला प्रेयसीला भेटवस्तू देताना खिशाचा विचार करताना दिसत नाहीत. चीन देशातील अशाच एक प्रेमवीराने आपल्या प्रेयसीसाठी एक बहुमूल्य ‘बुके’ भेट म्हणून पाठविला. सध्या तो युवक राहत असलेल्या भागामध्ये सर्वत्र ह्याच प्रेमवीराची आणि त्याने पाठविलेल्या अनोख्या बुकेची चर्चा रंगत आहे.

ह्या पठ्ठ्याने आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी असा काही कारनामा केला, की तो पाहणाऱ्यांनी आणि त्याच्याबद्दल ऐकणाऱ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. ही घटना चीनमधील चोंगकिंग शहरातील असून, येथील एका आलिशान हॉटेलमध्ये एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या वाढदिवसानिमित्त चक्क नोटांनी बनलेला भला मोठा बुके भेट दिला. ह्या बुकेचा आकार इतका मोठा आहे, की तो पाहून सर्वांचे डोळे आश्चर्याने विस्फारल्या शिवाय राहिले नाहीत.

नोटांनी बनविल्या गेलेल्या ह्या बुकेमध्ये ३३०,००० युआन, म्हणजेच तब्बल पस्तीस लाख सत्तर हजार रुपये किंमतीच्या नोटा आहेत. ह्या अनोख्या, बहुमूल्य बुकेने सगळीकडे धमाल उडवून दिली असून, सर्वतोमुखी हाच विषय बोलला, ऐकला जात आहे. एकीकडे ह्या बुकेची चर्चा सुरु असताना दुसरीकडे चीनच्या पीपल्स बँकच्या प्रतिनिधीने, ह्या व्यक्तीने चीनच्या मुद्रांकाचे हकनाक नुकसान केले असल्याचे म्हटले असून त्याचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यमुळे आता ह्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment