ह्या अल्पपरिचित गावांच्या आहेत काही खास परंपरा


हस्तकला आणि हातमागावर बनविलेल्या साड्या, किंवा इतर परीधानांच्या बाबतीत बोलायचे झाले. तर भारताइतकी विविधता कुठेच पाहायला मिळत नाही. ह्या परंपरा अनेक वर्षांच्याच नव्हे तर अनेक शतकांपासून चालत आलेल्या आहेत. पाषाणमूर्तींवरील सुन्दर कोरीव कामापासून ते हाताने केलेले नाजूक भरतकाम, जरी काम, अतिशय कौशल्याने बनविलेल्या धातूच्या वस्तू, मूर्ती, अश्या प्रत्येक कलाकृतीला स्वतःचा असा इतिहास आहे. ह्या कलाकृतींच्या माध्यमातून त्या त्या प्रांताच्या संस्कृतीचे, परंपरांचे दर्शन आपल्याला घडत असते. त्या त्या प्रांतांतील गावांमध्ये ह्या कलाकृतींचे निर्माण हा तेथील कुटुंबांचा मुख्य व्यवसाय असलेले पहावयास मिळते. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतींना जगभरातून चांगली मागणी देखील असते.
आग्रा भागातील संगमरवरी वस्तू, कच्छ भागातील कपड्यांवरील बांधणीचे काम, बनारस, कांचीपुरम येथील रेशमी साड्या, लखनऊची चिकनकारी, काश्मिर मधील गालिचे आणि पश्मीना ह्या त्या त्या प्रांताची खासियत असणाऱ्या वस्तूंचे उदाहरण आहे. पण ह्या शिवाय भारतभर अशी कितीतरी गावे आहेत ज्यांमध्ये अनेक हस्तकलेचे उत्तम नमुने पाहायला मिळतात, पण ह्या वस्तू बनविणारे कारागीर आणि त्यांच्या कलाकृती लोकांच्या फारशा परिचयाच्या नाहीत. तसेच ह्यांच्या कलाकृतींना बाजारामध्ये चांगली किंमत मिळत नसल्याने ह्या लोकांना नाईलाजास्तव हे काम सोडून, पैसे मिळवण्यासाठी इतर शहरांमध्ये स्थलांतर करावे लागते.

थिरूचीगडी हे लहानसे गाव तामिळनाडू शहरामध्ये निलगिरीच्या पायथ्याशी वसलेले आहे. ह्या गावामध्ये कोटा जमातीच्या आदिवासींची संख्या जास्त असून, चिकण मातीची भांडी बनविण्यामध्ये ह्यांचा हातखंडा आहे. मातीची भांडी बनविण्याची कला इतर प्रांतांमध्ये ही अवगत असली, तरी इथे बनविली जाणारी भांडी विशिष्ट तऱ्हेची असून, ह्या जमातीतील केवळ स्त्रिया ही भांडी बनवितात. ही कला एका पिढीच्या स्त्रियांकडून पुढच्या पिढीच्या स्त्रीयांना शिकविली जाते.

चांदीचे नक्षीकाम हे ओडिशा मधील कटकमधील ताराकासी येथे गेल्या पाचशे वर्षांपासून चालत आले आहे. ही कला इंडोनेशियामधून भारतात आल्याचे इतिहासकार म्हणतात. ताराकासी मध्ये प्रचलित असलेल्या ह्या कलेमुळे कटक शहराला ‘चांदीचे शहर’ म्हटले जाते. ह्या कामाकरिता अतिशय कौशल्याची गरज असते. हे काम अतिशय नाजूक असून ह्यामध्ये चांदी आणि सोने ह्या दोन्ही धातूंचा वापर होतो. ह्यामध्ये चांदी किंवा सोन्याच्या तारेच्या मदतीने वस्तूवर नाजूक नक्षीकाम केले जाते.

मुगा सिल्कने बनविले गेलेले पोशाख, साड्या जगप्रसिद्ध आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ह्याला खूप मागणी ही आहे, पण हे रेशीम विणणारे सुआलकुची गावातील कारागीर मात्र लोकांच्या फारशा परिचयाचे नाहीत. रेशमी परिधान विणण्याची परंपरा ह्या गावामध्ये अकराव्या शतकापासून चालत आली आहे. अकराव्या शतकामध्ये पाल राजवंशाचे राजे धर्मपाल ह्यांनी ह्या कलेला पुढे आणण्यात मोलाचा वाटा उचलून ही कला विकसित करण्याच्या उद्देशाने तांतीकुची गावातून २६ विणकर परिवार सुआलकुची गावामध्ये आणून वसविले. आजच्या काळामध्ये ह्या गावातील प्रत्येक घरामध्ये रेशमाचे विणकाम होते.

लद्दाखमध्ये बनविले जाणारे ‘चोत्क्सी’ नामक कोरीव काम केलेले सुंदर टेबल येथील खासियत आहे. लेह, चोगलमसर, वानला ह्या गावांमध्ये बनविली जाणारी, अतिशय सुंदर, रंगेबिरंगी कोरीवकाम असणारी ही टेबले येथील लोकांच्या घरांमध्ये हमखास दिसतात. ही टेबले दुमडून बंद करता येण्यासारखी असल्यामुळे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सोपी असतात. ह्या टेबलांवर केलेल्या कोरीवकामांमध्ये हिमवाघ, ड्रॅगन, ढग, शंख, कमळे ह्या आकृती प्रामुख्याने दिसून येतात. त्याचप्रमाणे आसामच्या सारथेबारी मधील प्रत्येक घरात धातूंच्या वस्तू बनविल्या जातात. ह्या धातूंच्या वस्तू बनविण्याची पद्धतच त्यांची खासियत आहे. ह्या वस्तू बनविणाऱ्या कारीगरांना कहर, किंवा ओर्जा ह्या नावाने ओळखले जाते. ह्या गावातून पायी फिरताना येथील घर-घरामधून धातूच्या वस्तू बनविताना वापरल्या जाणाऱ्या हातोड्यांचा आवाज ऐकू येत असतो. स्वयंपाकाच्या भांड्यांपासून ते शोभेच्या वस्तूंपर्यंत अनेक तऱ्हेच्या वस्तू येथे बनविल्या जातात.

Leave a Comment