मोदींच्या गुजरातमध्ये पेट्रोल ८ रुपये स्वस्त


मुंबई – महाराष्ट्रापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये पेट्राेल ८ रुपये ४७ पैसे स्वस्त असून महाराष्ट्रात पेट्राेलवर नऊ रुपये अतिरिक्त कर आकारला जाताे. त्यात तीन रुपये दुष्काळ कर, तीन रुपये महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन भरून काढण्यासाठी लावलेला कर, एक रुपया शिक्षण, एक रुपया स्वच्छ भारत अभियान व एक रुपया कृषी कल्याण कराचा समावेश असताे. हे कर गुजरातमध्ये आकारले जात नाहीत, म्हणून तेथे पेट्राेल स्वस्त आहे.

बुधवारी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात पेट्राेलपंपांवर गुजरातच्या तुलनेत पेट्राेलच्या दरात प्रतिलिटर ८ रुपये ४७ पैसे, तर डिझेलच्या दरात १ रुपया ६१ पैसे तफावत हाेती. म्हणूनच गुजरातच्या सीमावर्ती भागात वास्तव्य असलेल्या महाराष्ट्रातील वाहनचालकांनी तापी जिल्ह्यात उच्छल शहराच्या पेट्राेलपंपावर गर्दी केली. नंदुरबार, नवापूर, तळाेदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील पेट्राेलची किरकाेळ विक्री करणारे व्यावसायिक प्लास्टिकचे ड्रम, कॅनने गुजरात राज्यातून पेट्राेल आणून महाराष्ट्रात विक्री करत आहेत. परंतु, पेट्राेल हे ज्वलनशील असल्याने वेळप्रसंगी ४५ अंश तापमानात ते पेट घेण्याचा धाेका आहे. असे असले तरी बुधवारी पेट्राेलची शेजारील राज्यातून खुलेआम वाहतूक सुरू होती.

गुजरातमध्ये ७७.१३ रुपये पेट्रोल, तर ८५.६० रुपये लिटरने महाराष्ट्रात विक्री हाेते. गुजरातमधून पेट्राेल आणले तर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा ८.४७ रुपयांचा फायदा होतो. गुजरातमध्ये डिझेल ७३.८७ रुपये लिटर मिळते. ते ७२.२६ रुपये लिटर मिळते. महाराष्ट्रात १.६१ रुपये डिझेल स्वस्त आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील पानटपरी, किराणा व्यावसायिक गुजरातेतून पेट्रोल ७७.१३ रुपये लिटरने आणतात. महाराष्ट्रात ते ९० किंवा १०० रुपये दराने किरकाेळ विक्री करतात.

Leave a Comment