ओलाच्या मालकाकडे नाही स्वतःची एकही कार


मुंबई – स्वतःच वाहन नसल्यास मेट्रो शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी आपण भाड्याच्या गाडयांना प्राधान्य देतो. गाड्या आज काल भाड्याने मिळणे देखील कठीण झाले आहे. पण स्मार्टफोनच्या वापरामुळे गेल्या काही वर्षात प्रवास करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. अगदी काही मिनिटांत स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या दाराजवळ टॅक्सी उपलब्ध होते. या टॅक्सी व्यवसायात उबर ही परकीय कंपनी अग्रेसर आहे. पण या परदेशी कंपनीला बाजारपेठेत ओला ही भारतीय कंपनी टक्कर देताना दिसत आहे. नवीन युवा उद्योजकांना ओला या भारतीय टॅक्सी स्टार्टअप कंपनीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

ओला या टॅक्सी सर्व्हिस कंपनीची मुंबईत आयआयटी मधून कॉम्पुटर सायन्स विषयात पदवीधर असलेल्या भावेश अग्रवाल याने सुरुवात केली. भावेश आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्ट या नामांकित कंपनीत रिसर्चर म्हणून काम करत होता. भावेशने त्यावेळी स्वता:च अस काही करावे या विचाराने मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सोडली. भावेशला अनेकांनी मायक्रोसॉफ्टमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यामुळे वेड्यात काढले. पण आपल्या निर्णयावर भावेश ठाम होता. भावेशला मायक्रोसॉफ्टमध्ये असताना दोन पेटंट मिळाले होते. या बरोबर त्याचे ३ रिसर्च पेपर देखील प्रकाशित केले होते. स्वत:च अस काहीतरी वेगळे करायची भावेशला इच्छा होती. त्याने या जिद्दीतूनच ३ डिसेंबर २०१० रोजी ओला या टॅक्सी सर्व्हिस कंपनीची सुरुवात केली.

एकदा एका टॅक्सीतून भावेश प्रवास करत होता. अचानक त्यावेळी त्या टॅक्सी चालकाने मध्येच टॅक्सी थांबवली आणि पैशाची मागणी केली. भावेश या खराब अनुभवातून बरेच काही शिकला आणि त्यांनी लोकांचा त्रास कमी करण्यासाठी स्वस्त, सुरक्षित आणि जलद टॅक्सीसेवा देण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले आणि यातूनच ओला टॅक्सीची सुरुवात सुरु झाली.

भावेशने ओला टॅक्सी सर्व्हिसला तंत्रज्ञानासोबत जोडल्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा देता येईल. प्रवासी या बरोबरच स्मार्टफोनद्वारे टॅक्सी बुक करतील आणि त्यांची लुट देखील होणार नाही. भावेश प्रमाणेच स्वतःच काहीतरी वेगळ करण्याची उर्मी आणि जिद्द असलेल्या अंकित भाटी आणि भावेशची भेट झाली. भावेश व अंकित हे आयआयटी मधील मित्र होते व अंकित व भावेश यांनी यानंतर भागीदारीत व्यवसायाला सुरुवात केली.

जेव्हा भावेश याने व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा खूप प्रश्न त्यांच्या आई वडिलांना सतावात होते. त्यांना वाटत होते की केवळ गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आपला मुलगा करत आहे. पण ओलाची पहिली कमाई जेव्हा आली तेव्हा त्यांना आपला मुलगा काय करतो याचा अंदाज आला.

ओलाकडे आताच्या घडीला तब्बल ६ लाख गाड्या मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, म्हैसुर, जयपुर, अहमदाबादसह जवळपास ११० शहरांमध्ये ग्राहकांना सेवा पुरवितात. तब्बल ७५८ कोटींच्या घरात ओलाची सध्याची वार्षिक उलाढाल आहे. त्याचबरोबर सन २०१४-१५ चे वार्षिक उत्पन्न ४१८ करोड व सन २०१५-१६ चे वार्षिक उत्पन्न तब्बल ७५४ कोटीच्या घरात असल्यामुळे या सर्व आकडेवारीच्या आधारे ओलाची एकंदरीत ताकद लक्षात येते.

आपल्या व्यवसायाकरीता भावेश इतका झपाटलेला होता, की आयुष्यभर त्यांनी स्वताचे वाहन न घेण्याचा पण केला आहे. ज्यामुळे तो स्वत:ही ओला सर्व्हिसचा वापर करू शकेल. ओलाकडे आज स्वतःची एकही टॅक्सी नाही. ओला या व्यवसायात अनेकांना भागीदार करून घेते आणि त्यांना नवीन व्यवसायाच्या संधी पुरविते, चालक, मालक आणि ओला हे सर्व मिळून ग्राहकांना सेवा पुरवितात. तरुणांना भावेश एक कानमंत्र देतो. स्वप्न तर सर्वच पाहतात, पण त्यासाठी जोखीम मात्र काही मोजकेच उचलतात. स्वप्न पूर्ण करण्याची धमक असेल तरच स्वप्न पाहावी. सल्ले तर अनेक देतात. त्यामुळे ही यशोगाथा नवीन युवा उद्योजकांना नक्की प्रेरणादायी ठरेल.

Leave a Comment