शाही विवाहसोहळ्यासाठी खर्च होणार एवढे पैसे !


जगभरातील लोकांचे लक्ष आता ब्रिटनच्या शाही घराण्यामध्ये संपन्न होणार असलेल्या विवाहसोहळ्याकडे लागून राहिले आहे. हा विवाहसोहळा उद्या, म्हणजेच १९ मे रोजी पार पडणार असून, ब्रिटीश राजघराण्याचे राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल नयनरम्य सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होणार आहेत. ह्या समारंभासाठी खुद्द राणी एलिझाबेथच्या वतीने जगभरातील बाराशे पाहुणेमंडळींना खास आमंत्रणे पाठविली गेली आहेत. ह्या विवाहसोहळ्याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली असून, ह्या समारंभाशी निगडीत सर्वच गोष्टींना सोशल मिडीयाच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी मिळत आहे.

‘रॉयल वॉच’च्या वतीने, ह्या विवाहसोहळ्यासाठी किती पैसे खर्च होणार आहेत ह्याचा अंदाज घेणारा एक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानुसार मेघन मार्कल आणि प्रिन्स हॅरी ह्यांच्या विवाह समारंभाचा खर्च साधारण ४५ मिलियन डॉलर्स इतका असू शकेल असा अंदाज आहे. ह्या खर्चापैकी एक मोठा हिस्सा जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती आणि अर्थातच शाही परिवारजनांच्या सुरक्षेसाठी खर्च होणार आहे. तसेच मेघन मार्कलच्या वधूच्या पोशाखा साठी देखील मोठी रक्कम खर्च केली गेली आहे.

हा दिवस मेघन आणि हॅरी दोघांसाठी अतिशय महत्वाचा असून, जगातील सर्वात महाग आणि आलिशान विवाह समारंभांपैकी एक असा हा विवाह सोहळा असणार आहे. काही वर्षे आधी पार पडलेल्या प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन ह्यांच्या विवाह समारंभासाठी २८ मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले होते. ‘ब्राईडबुक’ नुसार १९ मे रोजी पार पडणार असलेल्या ह्या समारंभासाठी केल्या गेलेल्या सुरक्षाव्यवस्थेवर सर्वात जास्त खर्च केला जाणार आहे. ह्यामध्ये विवाह समारंभ पार पडणार असलेल्या ठिकाणी आणि तिथे पोहोचण्याच्या मार्गावर सगळीकडे साध्या वेशातील पोलीसकर्मी, तसेच स्नायपर्स तैनात असतील.

ह्या विवाह समारंभासाठी अद्ययावत सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात येणार असून ह्यामध्ये ड्रोन्सचा ही मोठ्या प्रमाणावर समावेश असेल. समारंभासाठी आलेल्या पाहुणे मंडळींच्या भोजन व्यवस्थेसाठी देखील मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे. वधू मेघन मार्कल ह्या विवाहसमारंभासाठी परिधान करणार असलेल्या पोशाखाची किंमत सुमारे १३५,००० डॉलर्स आहे. केट मिडलटनने तिच्या विवाहाच्या वेळी परिधान केलेल्या पोशाखाची किंमत ४००,००० डॉलर्स इतकी होती.

Leave a Comment