‘डी-टॉक्स वॉटर’ म्हणजे नेमके काय?


फिटनेस जगतात, वर्क आउट, डायट, ह्यासोबतच ‘डी-टॉक्स’ हा शब्द देखील वारंवार ऐकायला मिळत असतो. शरीर, त्वचा, डी-टॉक्स करण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केला जातो. त्यांच्या पैकी एक म्हणजे ‘डी-टॉक्स वॉटर’. पाणी हे आपल्या शरीरासाठी स्वतः होऊनच ‘डी-टॉक्सिफिकेशन’चे, म्हणजे शरीरातील हानिकाक्र्क पदार्थ लघवीवाटे किंवा घामावाटे बाहेर टाकण्याचे काम करीत असते. ह्याच पिण्याच्या पाण्यामध्ये आणखीन काही नैसर्गिक गोष्टींचा समावेश करून डी-टॉक्स वॉटर तयार करता येते. ह्या पाण्याच्या सेवनाने शरीरातील हानिकारक द्रव्ये, विषारी घटक बाहेर टाकले जाऊन शरीर, त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

डी-टॉक्स वॉटर बनविण्यासाठी रसभरीत फळे व भाज्या, म्हणजेच सफरचंद, कलिंगड, सालासकट चिरलेली संत्री, मोसंबी, लिंबे, काकडी, पुदिना, इत्यादींचे तुकडे करून ते एक लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यामध्ये घालून रात्रभर ठेवावेत. हे पाणी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. सकाळी उठून हे पाणी प्यावे, तसेच दिवसभर ह्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी शक्यतो काचेच्या बाटलीमध्ये किंवा जगमध्ये तयार करावे. जर तुम्ही ह्या पाण्यामध्ये करवंदे किंवा स्ट्रॉबेरीज सारखी फळे वापरणार असाल, तर ही फळे पाण्यामध्ये घालण्यापूर्वी हलकीशी चमच्याने ठेचून घ्यावीत. ह्यामुळे फळांमधील रस आणि फायबर्स पाण्यामध्ये मिसळतील. हे दोन्हीही शरीरासाठी पौष्टिक आहेत. डी-टॉक्स वॉटर बनविण्यासाठी शक्यतो त्या त्या हंगामातील फळे किंवा भाज्यांचा उपयोग करावा. हे पाणी तयार झाल्यानंतर दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळा पिऊन संपवावे.

आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक असते, हे आपल्याला ठाऊकच आहे. योग्य मात्रेमध्ये पाणी प्यायल्याने शरीराला आद्रता मिळते, पचनकार्य सुरळीत राहते, आणि शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर टाकली जातात. त्याचप्रमाणे डी-टॉक्स वॉटरचे नियमित सेवनही फायदेशीर आहे. तहान, भूक लागली असता पॅकेज्ड ज्यूस किंवा चहा, कॉफी घेण्यापेक्षा डी-टॉक्स वॉटरचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. फळांचे, भाज्यांचे सत्व असलेले पाणी पिणे हा ताजी फळे, किंवा भाज्या खाण्याला पर्याय नक्कीच नाही, पण तरीही हे पाणीही तितकेच लाभकारी आहे. हे पाणी आपण आपल्यासोबत कुठे ही नेऊ शकतो, दिवसभरामध्ये कधीही पिऊ शकतो. ह्या पाण्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहून, अंगावर आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

डी-टक्स वॉटर अतिशय चवदार असले, तरी ह्याचे सेवन दिवसाकाठी दोन लिटर पेक्षा जास्त करू नये. ह्याच्या अतिसेवनामुळे किडनीवर प्रेशर वाढू शकते. तसेच शरीरामध्ये सोडियमची पातळी कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो, स्नायूंमध्ये क्रँप्स येऊ शकतात. जर किडनीजवर प्रेशर वाढले, तर वॉटर रीटेन्शन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment