भारतीय शास्त्रज्ञांनी बनविले बॅटरीची शक्ती 100 पट वाढविणारे उपकरण


स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांसारख्या उपकरणांच्या बॅटरीचे आयुष्य 100 पट वाढू शकेल, असे अनोखे उपकरण बनविले असल्याचा दावा अमेरिकेतील भारतीय मूळ असलेल्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

अमेरिकेतील मिसूरी विद्यापीठाच्या संशोधकांनी हे चुंबकीय साहित्य विकसित केले आहे. हे उपकरण षटकोनी ‘हनीकॉम्ब’ सारखी संरचना तयार करते. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक गुण असतात. सेमीकंडक्टर डायोड आणि अॅम्प्लिफायर्स हे साधारणतः सिलिकॉन किंवा जर्मेनियम या पदार्थांपासून बनविण्यात येतात. हेच सेमीकंडक्टर डायोड आणि एम्प्लीफायर्स या आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे मुख्य घटक आहेत, असे मिसूरी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर असलेले दीपक के. सिंह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

सिंह यांच्या चमूने सिलिकॉनच्या पृष्ठभागावर हनीकॉम्ब मिश्रण एकत्रित करून त्यातून दोन पृष्ठभाग असलेले हे उपकरण विकसित केले आहे. हे नवीन उपकरण एकाच दिशेने विजेचे वहन करते. चुंबकीय डायोड नवीन चुंबकीय ट्रान्झिस्टर आणि अॅम्प्लिफायर्ससाठी रस्ता तयार करतात. या कार्यात अत्यंत कमी वीज खर्ची पडते आणि त्यामुळे ऊर्जेचा खपही कमी होतो. याचाच अर्थ की हे उपकरण बॅटरीचे आयुष्य 100 पटींपेक्षा जास्त वाढवू शकते, असे सिंह यांनी सांगितले.

Leave a Comment