कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या आघाडीनंतर शेअर बाजारात उसळी


मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरु झाली असून भाजपने सुरूवातीला हाती आलेल्या आकडेवारीनुसार आघाडी घेतली आहे. कर्नाटकात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र समोर येताच शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. बाजार आज उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिर होता. पण कर्नाटकात भाजपने आघाडी घेतल्याचे स्पष्ट होताच २५६ अंकाच्या वाढीसह सेन्सेक्स ३५,८१२ वर पोहोचला आहे, तर ५८ अंकांच्या वाढीसह निफ्टी १०,८६५ वर पोहोचला आहे.

यापूर्वी गुंतवणूकदारांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी शेअर बाजार स्थिर राहिला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये सोमवारी २० अंशांची वाढ होऊन तो ३५ हजार ५५६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ८०६ अंशांवर स्थिर राहिला होता.