केरळच्या ‘या’ मंदिरात प्रवेशासाठी पुरुषांना महिलांसारखे नटावे लागते


देशातील प्रत्येक मंदिरांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज असून देशातील काही ठिकाणच्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्यास बंदी आहे तर पुरुषांना काही मंदिरांमध्ये जाण्यास मज्जाव आहे. पण केरळमधील एका मंदिरात प्रवेश करण्यासाठी महिलांसारखे पुरुषांना तयार होऊन प्रवेश करावा लागतो.

ही प्रथा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील श्री कोत्तानकुलांगरा देवी मंदिरातील आहे. दरवर्षी या मंदिरात चाम्याविलक्कू हा सण साजरा केला जातो. वेगवेगळ्या गावांमधुन पुरुष भक्त या सणासाठी महिलांच्या वेषात देवीच्या दर्शनासाठी येत असतात. महिलांच्या वेषात तयार होण्यासाठी या पुरुषांना मंदिर परिसरात वेगळी मेकअप रुम तयार करण्यात आली आहे. फक्त महिलांसारखी साडीच नाही तर दागिने, संपूर्ण मेकअप, केसांना गजरा लावून या सणासाठी पुरुष सजतात आणि नटतात.

देवीच्या दर्शनासाठी फक्त पुरुषच नाही तर तृतीयपंथी देखील मोठ्या संख्येने येतात. महिला, तृतीयपंथी यांना या मंदिरात प्रवेश करण्यासाठी परवानगी आहे. पण जर मंदिरात पुरुषांना प्रवेश करायचा असेल तर त्यांना महिला वेषातच जावे लागेल. त्यांना महिलांसारखे सोळा श्रृंगार करुन पुजा करावी लागते, अशी या मंदिराची अख्यायिका आहे.

या प्रथेबाबत गावकरी सांगतात की, या मंदिरातील देवीची मुर्ती ही स्वयम प्रकट झाली असून हे एकमेव असे मंदिर आहे ज्याच्या गाभाऱ्याला छत नाही आहे किंवा कोणताही कलश नाही. या गावाची चर्चा या अनोख्या प्रथेमुळे सर्वदूर पसरली आहे.

Leave a Comment