रिझर्व्ह बँकेने २००९ नंतर प्रथमच केली अडीच टन सोने खरेदी


रिझर्व बँकेने २००९ सालातील २०० टन सोने खरेदीनंतर २०१८ सालात प्रथमच २.५ टन सोने खरेदी केली असून हे देशाच्या विदेशी भांडारात भर घातली आहे. हि खरेदी मार्च २०१८ अखेर दोन टप्प्यात केली गेली. हे सोने जागतिक नाणेनिधी कडून खरेदी केले गेले असून नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारताकडे मार्च २०१८ अखेर असलेला सोने साठा ५६०.३ टनावर गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डॉलरवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी अनेक देशाच्या केंद्रीय बँका अशी सोने खरेदी करतात. भारताने केलेली हि सोने खरेदी प्रायोगिक पातळीवर असून याचा निर्णय केंद्र सरकारने अर्थसंकल्पापूर्वीच घेतला होता मात्र तो जाहीर केला गेला नव्हता. २.५ टन सोने खरेदी ही फार महत्वपूर्ण नाही असे अर्थमंत्रालयातील अधिकारी सांगत आहेत.
अश्या प्रकारची सोने खरेदी तुर्कस्तान आणि रशियाकडूनही केली जाते. रशिया गेली ३ वर्षे दरवर्षी २०० टन सोने खरेदी करत आहे. जगात सध्या सर्वाधिक सोने साठा अमेरिकेकडे आहे. त्यांच्याकडे ८१३३.५ टन सोने असून त्याखालोखाल जर्मनी ३३७२ टन, नाणेनिधी २८१४ टन यांचा नंबर आहे. ५६०.३ टन सोने साठा असलेला भारत या यादीत ११ व्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment