
नाशिक – मागील १५ दिवसांत नाशिक येथील करन्सी नोट प्रेसने (सीएनपी) नोटांची छपाई ४० टक्क्यांनी वाढवून ५०० रूपयांची सुमारे ८ कोटी नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) सुपूर्द केले आहेत. प्रत्येक दिवशी १ कोटी नोटांऐवजी १.४ कोटी नोटा सिक्युरिटी प्रिटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एसएमपीसीआयएल) छापत आहे. देशातील अनेक भागात गेल्या काही दिवसांत नोटांचा तुटवडा झाल्याचे पाहताच हा बदल करण्यात आला आहे.
१५ दिवसांत नाशिक प्रेसने छापल्या ५०० रूपयांच्या ८ कोटी नोटा
नोव्हेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यंत प्रेसला आरबीआयने कोणतीही नवीन ऑर्डर दिली नसल्यामुळे ५०० रूपयांच्या नोटांची छपाई केली जात नव्हती. आरबीआयकडून नवीन डिझाइनची प्रतिक्षा करत असलेल्या प्रेसने एप्रिलपासून १०० आणि २० रूपयांच्या नव्या नोटाही छापलेल्या नाहीत. २०० रूपयांच्या नोटांच्या छपाईची ऑर्डर मध्य प्रदेशमधील प्रेसला देण्यात आल्यामुळे त्या नोटाही नाशिकमधून छापले जात नाहीत.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५०० रूपयांच्या नव्या नोटांची छपाई एप्रिलच्या मध्यात सुरू करण्यात आली आहे. या नोटांना बाजारात जाण्यासाठी तयार होण्यास एका आठवड्यापेक्षा जास्त काळ लागला. आता प्रत्येक दिवशी ५०० रूपयांच्या ८० लाख नोटा छापल्या जात आहेत. हे प्रमाण काही दिवसांतच दिवसाला १.२ कोटी नोटांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
