सचिन बन्सल यांची कर्मचाऱ्यांसाठी भावनिक पोस्ट


नवी दिल्ली – फ्लिपकार्ट ही भारतीय ई-कॉमर्स कंपनी अमेरिकन रिटेल कंपनी वॉलमार्टने खरेदी केली असून भारतीय व्यवसायातीलही चालू वर्षांतील आतापर्यंतचा भारतीय मूल्याप्रमाणे १.०७ लाख कोटी रुपयांमध्ये झालेला हा व्यवहार सर्वांत मोठा व्यवहार ठरला आहे. सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी या व्यवहारानंतर कंपनीला सोडचिठ्ठी देत फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. माझे येथील काम संपले आहे. ही ज्योत आता १० वर्षांनंतर दुसऱ्याच्या हातात देऊन फ्लिपकार्टमधून निघून जाण्याची वेळ आली असल्याचे सचिन बन्सल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बुधवारी या कंपनीचा वॉलमार्टने सर्वाधिक रक्कम मोजून ७७ % हिस्सा आपल्या ताब्यात घेतला. फ्लिपकार्ट खरेदी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वॉलमार्ट आणि अॅमेझॉन या दोन्ही कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू होती. हा व्यवहार पार पाडल्यानंतर सचिन बन्सल यांनी आपला ५.५ % हिस्सा विकत निर्गमन केला. या व्यवहारानंतर सचिन यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली.

नेहमीच ग्राहकांना फ्लिपकार्टने केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या गरजा लक्षात ठेवून त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. सर्वोत्तम लोकांसमवेत काम करण्याची संधी मला मिळाली. भारतीयांच्या खूप मोठ्या आणि किचकट समस्या अनेकदा सोडवल्या. पण आता सांगायला दु:ख होत आहे की माझे आता येथील काम संपले आहे. १० वर्षांनंतर आता ही ज्योत दुसऱ्यांच्या हाती सोपवण्याची आणि फ्लिपकार्टमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. पण बाहेरून मी तुमच्यावर लक्ष ठेवेन आणि तुम्हाला प्रोत्साहन देईन. तुम्ही चांगले काम कराल अशी मला आशा आहे. मी आता दीर्घ सुट्टीवर चाललो आहे. काही लोकांना गेल्या कित्येक वर्षांत मी वेळ देऊ शकलो नाही आता त्यांना वेळ देणार असल्याचे म्हणत आपल्या सहकाऱ्यांना सचिन यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment