दिवसभरामध्ये अधिक काळ बसणे आरोग्यासाठी अपायकारक


दिवसभरामध्ये अधिक काळ बैठी कामे करणे हे धुम्रपानाइतकेच आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे आता वैज्ञानिक सिद्ध करीत आहेत. आपण आपल्या आहाराच्या बाबतीत जागरूक असतो, तसेच फिटनेस साठी योग चांगले की पीलाटीज उत्तम ह्या चर्चेमध्ये देखील उत्साहाने सहभागी होत असतो. रात्रीची झोप किती तासांची हवी किंवा वर्षातून किती वेळा हेल्थ चेक अप्स करून घेणे गरजेचे आहे, ह्या प्रश्नांवरही आपण नेहमीच विचार करीत असतो. पण सध्याच्या शहरी जीवनाचा सर्वात मोठा दुष्परिणाम मात्र आपण दुर्लक्षितो आहोत.

शहरीकरण, औद्योगीकरण झाले, त्याचबरोबर अंगमेहनतीची कामे घटली. अगदी घरामध्ये देखील रोज करावी लागणारी कामे यंत्रांच्या मार्फत होऊ लागली. ऑफिसमध्येही अधिकाधिक कामे कॉम्प्युटरच्या माध्यमातून होऊ लागल्याने बैठ्या कामांचा वेळ वाढला आणि इतर शारीरिक हालचाल कमी झाली. त्याचबरोबर अगदी लहान मुलांपासून ते वडिलधाऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वच जण घराबाहेर फिरताना, खेळताना दिसण्याऐवजी घरामध्ये टीव्ही, मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या समोर अधिक दिसू लागले आहेत.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार आजकाल सामन्यपणे दिवसातील बारा तास आपण बैठ्या कामांमध्ये घालवितो. सांधेदुखी, मानेचे दुखणे, पाठदुखी ह्या द्वारे ह्या सवयीचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. दहा व्यक्तींपैकी किमान सहा व्यक्तींना ही दुखणी आहेत. खुर्चीवर अधिक काळ बसून राहिल्याने हाडांचे ‘डीजेनरेशन’ होते. जेव्हा आपण हालचाल करीत असतो, चालत असतो, उभे असतो, तेव्हा आपल्या पोटाचे आणि पाठीचे स्नायू सक्रीय असतात. जेव्हा आपण बसतो, तेव्हा हे स्नायू निष्क्रिय होतात. त्यामुळे ज्या व्यक्ती दिवसाचा अधिक काळ बसलेल्या स्थितीत असतात, त्यांचे हिप मसल्स आणि ग्ल्युट मसल्स निष्क्रिय राहतात. त्यामुळे ह्या स्नायूंची लवचिकता कमी होऊ लागते. बैठी कामे जास्त वेळ केल्याने सर्व्हायकल स्पॉन्डीलोसीस सारखे विकार उद्भवितात. तसेच गुडघे नि हिप्सच्या हाडांचे डीजेनरेशन सुरु होऊन ऑस्टीयोपोरोसीस सारखी व्याधी उद्भाविण्याचा धोका संभवतो.

जास्त वेळ बैठी कामे केल्याने आणि शरीराला आवश्यक तो व्यायाम न मिळाल्यामुळे हृदयाच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भविण्याचा धोका वाढतो. तसेच उच्चरक्तदाब, कोलेस्टेरोलची वाढलेली पातळी अश्या प्रकारच्या समस्या देखील उद्भवितात. टाईप २ प्रकारचा मधुमेह, व्हेरिकोज व्हेन्स अश्या प्रकारच्या समस्या शरीराला आवश्यक तो व्यायाम, हालचाल न मिळाल्यामुळे उद्भवू शकतात. तसेच शरीरामध्ये रक्ताभिसरण ही व्यवस्थित होऊ शकत नाही.

ज्या व्यक्ती दिवसाचा बहुतेक वेळ बैठ्या कामांमध्ये घालवितात, त्यांनी बसलेले असताना आपल्या पोश्चरवर लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. खांदे झुकवून, किंवा मान खाली झुकवून बसल्याने पाठदुखी किंवा मानदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच आपण बसण्यासाठी वापरत असलेल्या खुर्चीवरून आपले पाय जमिनीवर व्यवस्थित टेकतील असे पाहावे. आपण वापरत असलेली खुर्ची आरामदायक, पाठीच्या कण्याला सपोर्ट देणारी असावी. बैठे काम करताना देखील अधून मधून विश्रांती घेऊन थोडे चालून यावे, ह्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते. शक्य असेल तेव्हा ऑफिसमध्ये स्टँडिंग डेस्कचा वापर करावा. शक्य तिथे लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करावा. त्याचबरोबर दिवसातून काही काळ तरी व्यायामाकरिता देणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment