आता वाय-फायच्या सहाय्याने करता येणार लँडलाइन, मोबाइलवर कॉल!


नवी दिल्ली – आपत्कालीन स्थितीत असताना ऐनवेळी मोबाइल नेटवर्क न मिळाल्याने अनेकांची गोची होती. पण यापुढे मोबाइल नेटवर्क नसले तरी तुम्हाला लँडलाइन आणि मोबाइल फोनवर कॉल करणे शक्य होणार आहे. लवकरच प्रस्ताव स्विकारत देशभरात इंटरनेट टेलिफोनीला केंद्र सरकार मान्यता देणार असल्यामुळे मोबाइलला नेटवर्क नसले तरी चिंता करण्याची गरज नाही.

तसेच ज्यांच्याकडे टेलिफोनी लायसन्स आहे अशा टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्या तुम्हा नव्या मोबाइल क्रमांकासाठी ऑफर करु शकतात. तुम्हाला या मोबाइल क्रमांकासाठी कोणतेही सिमकार्ड घेण्याची गरज नसून तुम्ही इंटरनेट टेलिफोनी अॅप डाऊनलोड करत तुमचा क्रमांक अॅक्टिव्हेट करु शकता. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ट्रायच्या नियामक मंडळाने यासंबंधी प्रस्ताव मांडला होता.

हा प्रस्ताव दूरसंचार आयोगाने मंजूर केल्यामुळे इंटरनेट टेलिफोनी सर्व्हिस एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि इतर ऑपरेटर्स सुरु करु शकतात. ट्रायचे सल्लागार अरविंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटीसाठी नवे पर्याय मिळणार असून, त्याचा फायदा होईल. ग्राहकांना यामुळे अजून एक पर्याय उपलब्ध होईल, खासकरुन ज्या ठिकाणी नेटवर्कची प्रचंड समस्या आहे. याचा फायदा त्या इमारती आणि घऱांनाही होईल जिथे नेटवर्क मिळताना खूप समस्या होते, मात्र वाय-फाय नेटवर्क चांगले असल्याचे अरविंद कुमार यांनी सांगितलं आहे.

Leave a Comment