
मुंबई – गुगलने कामगारांच्या संघर्षाचं आणि एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिना’निमित्त डुडलद्वारे कामगारांच्या संघर्ष आणि त्यागाला अनोखी मानवंदना दिली आहे. गुगलने या निमित्त कामगारांच्या योगदानालाही उजाळा दिला आहे. तसेच डुडलद्वारे जगभरातील कामगारांना सलाम केला आहे. आजच्या डुडलवर स्टेथॅस्कोप, सुरक्षा हेल्मेट, नट-बोल्ट, पेंटींग रोल, बॅटरी, रबर ग्लोब, चष्मा, टॉर्च, बुट आणि इतर अनेक कामगारांचे साहित्य दाखवण्यात आले आहे.
गुगलचे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त खास डुडल
जागतिक कामगार दिन म्हणजेच श्रमिकांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष व एकजुटीची प्रेरणा देणारा दिवस असून त्याचे महत्त्व कामगारांसाठी चिरंतन राहील. व्यापारी, कारखानदार वगैरेचा आर्थिक वर्चस्व असलेला नवा वर्ग औद्योगिक क्रांतीनंतर अस्तित्वात आला. या वर्गाने राजकीय वर्चस्व हस्तगत केल्यानंतर भांडवलशाही युगाची सुरुवात झाली. अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर या संघटनेने असा संकल्प जाहीर केला की १ मे १८६६ पासून सर्व कामगारांसाठी आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्यात यावा. या मागणीच्या समर्थनार्थ ३ मे रोजी शिकागो शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात पाच लाख कामगारांनी भाग घेऊन शक्तिप्रदर्शन केले.
या मार्केटमध्ये त्यावेळी बॉम्बस्फोट झाल्याने कामगारांमध्ये धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती त्यामुळे नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलक कामगारांवर गोळ्या झाडल्या. अनेक कामगार त्यात ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
