‘प्लांट बेस्ड’ प्रथिने आरोग्यासाठी हितकारी


प्रथिने ही शरीराचे ‘बिल्डींग ब्लॉक्स’ म्हणून ओळखली जातात. शरीरातील पेशी, स्नायू त्यांना बळकटी देण्याचे काम प्रथिने करीत असतात. ज्या व्यक्ती नियमित वर्क आउट करीत असतात, त्यांना स्नायूंना पोषण मिळण्याची अधिक गरज असते. त्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. अंडी, मांस, दुध इत्यादी पदार्थांमधून प्रथिने आवश्यक मात्रेमध्ये शरीराला मिळत असतात. पण ज्या व्यक्ती शाकाहारी आहेत, त्यांनी प्रथिने कुठून मिळवायची असा प्रश्न त्यांना नेहमी पडत असतो. अश्या वेळी प्रोटीन पावडर सारख्या उत्पादनांचा वापर करून शरीराला आवश्यक ती प्रथिने मिळविण्याकडे त्यांचा कल असतो. दुधामध्ये प्रथिने असली, तरी केवळ दुध पिणे हा एकमेव पर्याय शाकाहारी व्यक्तींसमोर नाही. शाकाहारी व्यक्तींसाठी ‘प्लांट बेस्ड’ किंवा वनस्पतींपासून मिळविलेले अन्नपदार्थ प्रथिनांचे उत्तम स्रोत ठरू शकतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये असलेले दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ किंवा इतर सप्लीमेंटस् ह्यांचा जोडीने काही शाकाहारी ( प्लांट बेस्ड ) पदार्थांचा आहारामध्ये समावेश केला, तर शरीराची प्रथिनांची गरज सहज पूर्ण होऊ शकते.

प्रथिने आपल्या शरीराचे बिल्डींग ब्लॉक्स असल्याने आपल्या शरीरातील टिश्यूज्, स्नायू, रक्त कोशिका, हार्मोन्स ह्यांच्या निर्मितीला सहायक असतात. व्यायाम केल्यानंतर किंवा शारीरिक श्रम केल्यानंतर शरीरातील मसल रिपेअर साठी प्रथिनांची आवश्यकता असते. प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुध, मांस इत्यादी अन्नपदार्थांमधील प्रथिने शरीरामध्ये लवकर अवशोषित होतात हे जरी खरे असले, तरी शाकाहारी व्यक्ती किंवा व्हेगन जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्तींना ह्या प्रथिनांचे सेवन करणे शक्य होत नाही. अश्या वेळी प्लांट बेस्ड, म्हणजेच वनस्पतींपासून मिळविलेली प्रथिने सहायक ठरतात.

आहारतज्ञांच्या मते काही अन्नपदार्थ प्लांट बेस्ड प्रोटीन्सचे सर्वोत्तम स्रोत आहेत. ह्या मध्ये डाळी आणि कडधान्ये ही सहज उपलब्ध होणारी आहेत. डाळी आणि कडधान्ये ह्यांमध्ये कार्बोदाकांची मात्रा कमी असून, ह्यामध्ये प्रथिने मुबलक मात्रेमध्ये आहेत. तसेच ह्यांमध्ये भरपूर फायबर, लोह आणि पोटॅशियम हे तत्वे ही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचप्रमाणे सोयाबीन पासून तयार करण्यात येणारे पनीर, म्हणजेच टोफू हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे. टोफू आपल्या नेहमीच्या भाज्यांमध्ये घालून खाता येते. तसेच टोफूची जैविक व्हरायटी देखील उपलब्ध आहे.

बदाम आणि अक्रोड यांसारखा सुकामेवा प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे. बदाम तसेह खावेत, किंवा ह्यांचा समावेश आपल्या मिल्कशेक्स मध्ये करावा. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया जवस हे देखील प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. ह्या बिया तुम्ही आपल्या भाज्यांवर किंवा सॅलड्सवर घालून खाऊ शकता, किंवा तव्यावर हलक्या शेकून घेऊन तशाच खाऊ शकता. तसेच बाजरी, ज्वारी, किन्वा, राजगिरा ह्यांमध्ये ही प्रथिने मोठ्या प्रमाणात आहेत. राजमा, काबुली चणे हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment