आहारामध्ये ओमेगा ३ ची कमतरता असल्याने असे दिसून येतात परिणाम


ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. मेंदूचे आणि शरीरातील कोशिकांचे कार्य सुरळीत चालू राहावे यासाठी ओमेगा ३ अतिशय महत्वाची आहेत. तसेच शरीरामध्ये असलेले कोणत्याही प्रकारचे इनफ्लेमेशन आणि हृदयरोग, कर्करोग, संधिवात यांसारख्या विकारांपासून शरीराचे संरक्षण करण्याचे काम ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स करीत असतात. शरीरामध्ये वारंवार होणारी इन्फेक्शन दूर ठेऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम ओमेगा ३ करतात. साल्मन, ट्युना, मॅकरेल आणि सार्डीन्स ह्या माशांमध्ये ओमेगा ३ मुबलक मात्रेमध्ये आढळतात. तसेच जवस, चिया सीड्स, पालक, राजमा, सोयाबीन, फ्लॉवर, ब्रोकोली या भाज्यांमध्ये ही ओमेगा ३ भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे ओमेगा ३ ची शरीरातील कमतरता दूर करण्यासाठी ह्या अन्नपदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

जर ओमेगा ३ ची कमतरता असेल, तर त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येऊ लागतात. ज्या व्यक्तींना हृदयरोग आहे, त्यांच्यामध्ये एल डी एल कोलेस्टेरोलची पातळी वाढलेली आढळून येते. ओमेगा ३ जर अपुऱ्या प्रमाणात घेतले जात असेल, तर ही पातळी वाढत राहते. ह्या उलट ओमेगा ३ असलेल्या अन्नपदार्थांचा आहारामध्ये समावेश केला, तर ही पातळी घटू लागते. तसेच ह्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हृदयाच्या धमन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते.

ओमेगा ३ चे प्रमाण आहारामध्ये आवश्यकतेपेक्षा कमी असेल, तर सांधेदुखी सुरु होऊ शकते. किंबहुना ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी आहारामध्ये ओमेगा ३ चे प्रमाण वाढविल्याने त्यांची सांधेदुखी कमी झाल्याचे आढळून आल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ओमेगा ३ च्या सेवानाने सांध्यांना आलेली सूज कमी होऊन सांध्यांची हालचाल पूर्ववत आणि वेदनारहित होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मेंदूचे कार्य सुरळीत चालावे यासाठी देखील ओमेगा ३ची आवश्यकता आहे.

ओमेगा ३ ची कमतरता असल्याने त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यावर आणि परिणामी स्मरणशक्तीवर होऊ शकतो. वृद्ध व्यक्तींना स्मृतीभ्रंश झाल्यास ओमेगा ३ च्या सेवनाने स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच दृष्टीदोष कमी करण्याकरिता ही ओमेगा ३ चे सेवन करणे फायदेशीर आहे. विशेषतः ज्या व्यक्तींना ग्लॉकोमा आहे त्यांच्यासाठी ओमेगा ३ विशेष फायद्याचे आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी ओमेगा ३ अतिशय लाभदायक आहेत. ह्यांच्या कमतरतेमुळे त्वचा रुक्ष, कोरडी दिसू लागते. ओमेगा ३ मुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment