जपानला गवसला अमूल्य खजिना


जपानच्या मिनिमितोरी बेटांजवळ संशोधकांना चिखलात दडलेला अमूल्य खजिना गवसला असून याच्या विक्रीतून जपानला लक्षावधी डॉलर्सची कमाई करता येणार आहे असे वृत्त सीएनएन ने दिले आहे. हा खजिना म्हणजे हिरेमाणके नाहीत तर ती आहेत अतिशय दुर्मिळ आणि हायटेक उपकरणात वापरली जाणारी खनिजे.

या बेटाजवळ असलेल्या चिखलात १ कोटी ६० लाख टन वजनाची पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजे असावीत असा अंदाज केला जात आहे. यांचा वापर स्मार्टफोन, मिसाईल सिस्टीम, रडार, ताचे कॅमेरा लेन्स, सुपर कंडक्टर्स, बॅटरी सेल बनविण्यासाठी केला जातो. सध्या या बाजारावर चीनचा कब्जा आहे. मात्र जपान चिखलातील खनिजे काढू शकला तर चीनला मोठे आव्हान उभे राहणार आहे. सर्व जगाची गरज कित्येक शतके पुरविली जाईल इतका प्रचंड साठा याठिकाणी आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या खनिजांमध्ये यट्रीयम, युरोपियम, टर्बियम, डायस्प्रोशियम खनिजे आहेत. अर्थात या बेटांवर जाणे आणि तेथून हि खनिजे आणणे हे सोपे काम नाही. त्यासाठी उत्तम तंत्राचा वापर करावा लागेल तसेच हि खनिजे काढणे हे खर्चिक काम आहे. मात्र जपानने हे साध्य केले तर त्यांना अतोनात पैसा मिळू शकणार आहे असे समजते.

Leave a Comment