एटीएम कोरडी पण ईबेवर सहज मिळताहेत नव्या नोटा


देशभरात नागरिकांना बँकांची एटीएम नोटांचा पुरवठा करण्यास अक्षम असताना ईकॉमर्स साईट ईबे डॉट कॉम वर नव्या नोटा अधिक पैसे घेऊन विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे समजते. वास्तविक चलनी नोटांची अशी विक्री बेकायदा आहे तरीही या साईट वर नव्या १०, ५०, २०० आणि १ रुपयांच्या नोटा विकल्या जात आहेत. यात सर्वाधिक महाग १ रु.ची नोट असून १०० नोटची गड्डी ५५५ रुपयांना मिळते आहे.

या साईटवर विकल्या जात असलेल्या नोटा खऱ्या आहेत याची खात्री देण्यासाठी या नोटांवर रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही तर १ रु.च्या नोटेवर तत्कालीन अर्थसचिव शक्तीकांत दास याची सही आहे असा खुलासाही केला गेला आहे. १० रु.च्या १०० नोटांची गड्डी १६२०, २०० रु.गड्डी २६ हजार रुपयात मिळते आहे. नोटा घरपोच हव्या असतील तर ५० ते १०० रु. शिपिंग चार्ज द्यावा लागत आहे. तसेच मागणी केल्यावर २ ते ३ दिवसात नोटा मिळत आहेत असेही समजते.

बँक अधिकारी या संदर्भात म्हणाले बँकांना रोकड पुरवठा कमी होत आहे हे खरे आहे. त्यात लग्नाचा हंगाम असल्याने लोकांना हाताशी कॅश लागते. बँकेत ओळखीशिवाय रोकड मिळविणे शक्य होत नाही. मात्र तरीही ऑनलाईन वर देशाचे चलन विकणे बेकायदा आहे. रुपया हे आपले लीगल टेंडर आहे ते जादा किमतीला विकता येत नाहीच पण सरकारी परवानगीशिवाय नष्टही करता येत नाही.

Leave a Comment