महागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी


आजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत आहेत. अगदी सन-ग्लासेस पासून ते चष्म्याच्या फ्रेम पर्यंत, आणि फॅशन ज्वेलरी पासून ते हातातली पर्स किंवा हँड बॅग, शूज पर्यंत सर्व काही एखाद्या प्रसिद्ध ब्रँडचेच वापरण्याकडे आजकाल वाढता कल दिसून येत आहे. महिलांच्या बाबतीत म्हणायचे झाले, तर घराबाहेर पडताना आवर्जून बरोबर घेतली जाणारी वस्तू म्हणजे हँड बॅग, किंवा पर्स. हँड बॅग, हे आत केवळ पैसे, किंवा इतर आवश्यक वस्तू ठेवण्याचे साधन राहिले नसून आता ते ‘स्टाईल स्टेटमेन्ट’ झाले आहे. म्हणूनच सुप्रसिद्ध देशी विदेशी ब्रँडस् च्या हँड बॅग्सना बाजारामधे मोठी मागणी आहे. पण एखादी महागडी हँड बॅग खरेदी करताना, आपण ‘डुप्लीकेट’ बॅग तर खरेदी करत नाही ना, याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक मोठमोठ्या ब्रँडस् ची नावे वापरून नकली माल विकला जात आहे. आपली फसवणूक होऊ नये या करिता आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आपण निवडलेली बॅग ‘ ओरिजीनल ‘ आहे की ‘फेक’ आहे हे कळणे काहीसे कठीणच म्हणावे लागेल. पण ज्या व्यक्तीला हँड बॅग्स ची चांगली माहिती आहे, त्याला हा फरक कळल्यावाचून रहाणार नाही. उदाहरणार्थ ‘एर्मेस’ ( hermes )ह्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या बॅग्स हाताने बनविलेल्या ( हँड मेड ) असतात. त्यामुळे त्यांच्यावरील शिलाई पाहून त्या लगेच ओळखता येऊ शकतात. जर बॅग वरील शिवण मशीनची असली, तर ती बॅग ओरिजीनल नाही हे समजायला हरकत नाही.

तसेच महागड्या हँड बॅग्स विकत घेताना भरोश्याच्या आणि अधिकृत विक्रेत्याकडून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन बॅगची खरेदी केल्यास त्या बॅगला तुम्हाला हवे असणाऱ्या ब्रँडचे ‘ ऑथेंटीसिटी सर्टिफिकेट ‘ मिळू शकते. ह्यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात. पण म्हणून त्या बॅग्स ओरिजीनल असतात असे नाही. एखादी महाग ब्रँडची बॅग खरेदी करणे, ही एक प्रकारची गुंतवणूक म्हणता येऊ शकेल. त्यामुळे ती विकत घेताना अधिकृत विक्रेत्याकडून घेणे श्रेयस्कर असल्याचे ब्रँड एक्स्पर्ट्स म्हणतात.

Leave a Comment