आपली त्वचा अशी करा ‘डी–टॉक्स’


अभिनेत्री विद्या बालन ह्यांचे उत्कृष्ट अभिनय कौशल्य आपल्याला सर्वांनाच परिचयाचे आहे. अभिनयाच्या बाबतीत विद्या जितकी चोखंदळ आहे, तितकीच चोखंदळ ती तिच्या त्वचेच्या निगेबाबतही आहे. तिच्या नितळ, सुंदर त्वचेचे रहस्य, उत्तमपणे केला गेलेला मेकअप नसून, त्वचेची निगा राखण्याकरिता नैसर्गिक वस्तूंचा वापर हे आहे. विद्या प्रमाणे हे नैसर्गिक उपाय आपणही अवलंबले, तर आपली ही त्वचा निश्चितपणे सुंदर, नितळ दिसू शकते.

आपल्या आहारामध्ये प्रोसेस्ड अन्नपदार्थ, चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश जास्त असल्यास ह्यातील घातक घटक शरीरामध्ये साठत जातात. शरीरामध्ये साठलेली ही घातक तत्वे बाहेर टाकली जाण्यासाठी डी-टॉक्स डायटचा सल्ला आहारतज्ञ देतात. ह्या डायटमध्ये प्रोसेस्ड अन्नपदार्थ संपूर्णपणे वर्ज्य करून केवळ नैसर्गिक पदार्थांचे सेवन करावे लागते, जेणेकरून शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकले जातील. भरपूर पाणी पिणे, चहा कॉफीचे सेवन वर्ज्य करणे, ताज्या भाज्यांचे, फळांचे, त्याच्या ताज्या रसांचे सेवन करणे हा ह्या डायटचाच भाग आहे. ज्याप्रमाणे शरीराला डी-टॉक्स करण्याची आवश्यकता असते, तशीच गरज त्वचेच्या बाबतीतही उद्भवते.

प्रदूषण, सतत वापरला जाणारा मेकअप, तणाव, अपुरी झोप, असंतुलित आहार ह्यांचा परिणाम त्वचेवरही होत असतो. परिणामी त्वचेचा पोत बिघडतो, त्वचेवर मुरुमे येऊ लागतात, त्वचा कोरडी, तेजहीन दिसू लागते. त्वचा सुंदर राहावी या करिता महिन्यातून किमान एकदा त्वचा डी-टॉक्स करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्वचेतील ‘पी एच लेव्हल’ ही संतुलित राहते. त्वचा डी टॉक्स करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी सर्व मेकअप काढून टाकून चेहरा स्वच्छ धुवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुताना, जर त्वचा कोरडी असेल, तर ऑइल क्लेंजरचा किंवा फोम वॉशचा वापर करावा. जर त्वचा तेलकट असेल, तर वॉटर बेस्ड जेलचा उपयोग करावा. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा स्टीमरमध्ये गरम पाणी करून त्याची वाफ चेहऱ्यावर घ्यावी. त्याने त्वचेची रंध्रे खुली होतील. त्यानंतर मुलायम कपड्याने चेहरा पुसून कोरडा करावा.

चेहरा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर फेस मास्क लावावा. बाजारामध्ये प्रत्येक स्कीन टोन करिता तयार फेस मास्क्स उपलब्ध असले, तरी घरी तयार केलेला फेस मास्क जास्त उपयुक्त ठरतो. मुलतानी माती वापरून तयार केलेला फेस मास्क तेलकट त्वचेसाठी, तर दही आणि मधाचा वापर करून बनविलेला फेस मास्क कोरड्या त्वचेसाठी वापरावा. हा मास्क काही वेळ चेहऱ्यावर लावून ठेऊन नंतर चेहरा पाण्याने धुवावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर सिरम सोबत फेशियल ऑइलही लावावे.

त्वचा डी-टॉक्स करणे, हे योग्य आहाराच्या शिवाय शक्य होणार नाही. यासाठी आपल्या आहारामध्ये भरपूर भाज्या, ताजी फळे, पाणी यांचा समावेश असावा. त्याचबरोबर पुरेशी झोप आणि व्यायाम ह्यांचा ही समावेश आपल्या दैनंदिन जीवनात असावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment