कंबरदुखी कोणत्या कारणास्तव उद्भवते?


ऑफिसमध्ये तासंतास चुकीच्या पोश्चरमध्ये ( स्थिती ) बसून काम करणे किंवा घरामध्ये देखील सतत उभे राहून किंवा वाकून काम केल्याने कंबरदुखीची तक्रार सुरु होते. त्यातून व्यायामाची सवय नसेल, तर त्या अभावी कंबरेच्या स्नायूंना आवश्यक तो व्यायाम न मिळाल्याने कंबरेचे दुखणे आणखीनच बळावते. एके काळी कंबरदुखी हा उतारवयामध्ये उद्भाविणारा त्रास आहे असे म्हटले जात असे. पण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये कंबरदुखी कधी कोणाला उद्भवेल हे नेमके सांगता येणे कठीण झाले आहे. कंबरेचे दुखणे त्रासदायक असले, तरी ते कायमस्वरूपी असेलच असे नाही. पाठीची हाडे, स्नायू आणि लिगामेन्ट कितपत व्यवस्थित आहेत ह्यावर कंबरेचे दुखणे कितपत गंभीर आहे हे ठरत असते.

उठण्या-बसण्याच्या चुकीच्या सवयी, कॉम्प्युटर वर काम करीत असताना चुकीच्या स्थितीमध्ये ( पोश्चर ) बसणे, एखादी वजनदार वस्तू झटक्याने उचलणे किंवा ढकलण्याच्या प्रयत्न करणे, पाठीमागे वळताना झटक्याने वळणे या आणि अश्या अनेक कारणांमुळे कंबरदुखी सुरु होते. खूप जास्त वेळ उभे राहिल्याने देखील कंबरदुखी उद्भाविते. ही स्थिती वयस्क लोकांमध्ये जास्त आढळून येते. लहान मुले आणि किशोरवयीन ह्यांचे शरीर लवचिक असल्याने त्यांच्या वयामध्ये कंबरदुखी फारशी पहावयास मिळत नाही, मात्र लहान मुलांना जड दप्तरे उचलल्याने कंबरदुखीचा त्रास सुरु झाल्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत.

तज्ञांच्या मते, मानसिक तणावास कारणीभूत ठरणारी कामे, नैराश्य, महिलांमध्ये गर्भावस्था, जास्त वेळ बसून काम करणे, धुम्रपान, मद्यपान, वेळी अवेळी आणि अपुरी झोप, वाढते वय, लठ्ठपणा, अत्यधिक शारीरिक श्रम ह्या कारणांमुळे देखील कंबरदुखी उद्भवू शकते. कंबरदुखीचा त्रास टाळण्यासाठी भरपूर आणि योग्य शारीरिक व्यायाम, काम करताना, उठताना किंवा बसतानाचे योग्य पोश्चर, अन जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल केला, तर कंबरदुखीचा त्रास कायमस्वरूपी बरा करता येऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment