
रोम : इटलीमध्ये एकाचवेळी १ हजार ३७२ ह्य़ुमनॉइड रोबोंनी केलेल्या डान्सची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली असून चीनमधील विक्रम या डान्सनंतर मोडला गेला आहे. २०१६ पासून तंत्रज्ञान कंपन्या डान्स करणाऱ्या रोबोटची निर्मिती करतात. यात जास्तीत जास्त रोबोंनी एकाचवेळी डान्स करण्याचा रेकॉर्ड बनवण्याचा देखील उद्देश असतो.
गिनिज बुकात इटलीच्या रोबो डान्सची नोंद
मागील वर्षी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये रोबोटनी एकाचवेळी केलेल्या नृत्याची नोंद झाली होती. चीनमध्ये गतवर्षी ऑगस्टमध्ये १ हजार ०६९ डोबी म्हणजेच रोबोट नाचले.
आताचा हा विक्रम इटलीत झाला आहे. अल्फा १ एस रोबोंनी सामूहिक नृत्य केले. हे रोबो ४० सें.मी उंचीचे आहेत आणि ते अॅल्युमिनियमच्या संमिश्रापासून प्लास्टिक आवरणाने तयार केले आहेत. चीनच्या उबटेक कंपनीने ह्य़ूमनॉइड रोबो तयार केले असून २०१६ मध्ये याच रोबोंनी पहिला विक्रम केला होता.
या कार्यक्रमात गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डसचे लोरेन्झो वेल्ट्री यांनी निरीक्षक म्हणून काम केले. सर्व ह्य़ुमनॉइड रोबोच सारख्या वेळात न चुकता नृत्य करीत आहेत, याची खातरजमा करण्यात आली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने म्हटले आहे, यातील अल्फा १ एस रोबो हे लवचिक असून ते नृत्यातील वेगवेगळ्या लयी संगीतानुसार बदलू शकतात.
