भारतीयांना मोठे सरप्राईज देण्याच्या तयारीत गुगल !


मुंबई : लवकरच भारतीय स्मार्टफोन युझर्सना एक खुशखबर देण्याची तयारी गुगल करत असून गुगल भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पाय रोवण्यासाठी पिक्सेलचे स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. गुगल हे अॅपल, सॅमसंग यांसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पाऊल उचलणार आहे.

यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सध्या मिड-रेंज पिक्सेल स्मार्टफोनवर गुगल काम करत असून यावर्षी जुलै-ऑगस्टपासून हे स्मार्टफोन भारतात लाँच केले जाऊ शकतात. गुगल भारतीय बाजारात पाय रोवण्यासाठी खास धोरण आखत आहे. ज्यामध्ये, पिक्सेलबुकसारखे अनेक फोन भारतात येऊ शकतात.

गुगल या महिन्यात भारतात स्मार्ट स्पीकर लाँच करणार आहे. अमेझॉनच्या स्मार्ट स्पीकरशी या डिव्हाईसची टक्कर होईल. गुगल होम आणि गुगल होम मिनीचे दोन व्हेरिएंट लाँच केले जातील, ज्याची किंमत ९ हजार ९९९ रुपये आणि ४ हजार ४९९ रुपये असेल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुगल होम लाँच करण्यात आला होता, जो आता भारतातही उपलब्ध होईल.

गुगल व्हॉईस असिस्टंटसह हा स्मार्ट स्पीकर येईल, विशेष म्हणजे गुगल व्हॉईस असिस्टंट हिंदी भाषेलाही सपोर्ट करणार आहे. या डिव्हाईसवर गाणी वाजवण्याव्यतिरिक्त व्हॉईस कमांड टास्क, बातम्या, अलार्म, रिमाईंडर असे फीचर्सही मिळणार आहेत.

Leave a Comment