भारतातील सर्वच नोटा जीवाणू बाधित!


मुंबई: दुनिया पैशांवर चालते आणि पैशांची भाषा बोलते म्हणतात.. पैशाशिवाय तुमचं पानही हलत नाही. जिथे जाल तिथे हातात नोटा खेळवाव्याच लागतात. त्यात नोटा हाताळायला कोणाला नकोशा वाटतात? खाऊच्या बदल्यात अगदी लहान मुलांनाही नोटा दाखवल्या तर तेसुद्धा धावत येतील, पण चिमुकल्यांसह तुमच्या-आमच्या जीवाला याच नोटा धोकादायक ठरत आहेत.

भारतातील सर्वच नोटा जीवाणू बाधित आहेत. आपण अशाप्रकारे रोज कित्येक वेळा नोटा हाताळत असतो. पण याच नोटा तुमच्या जिवावर उठू शकतात. असा दावा आम्ही नाही तर फूड सेफ्टी अँड स्टँटर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया करत आहे.

भारतातील ५, १०, ५० आणि १००च्या नोटा इंटरनॅशनल जर्नल ऑफ डेंटल क्लिनीकने गोळा केल्या. या नोटा भाजी मार्केट, दूध डेअरी, बँक, पेट्रोल पंप अशा ठिकाणांवरुन जमा करण्यात आल्या होत्या. या नोटांवर ज्यावेळी संशोधन करण्यात आले त्यावेळी असे निदर्शनास आले की या सर्वच्या सर्व नोटा जीवाणूंनी बाधित होत्या. या बाधित नोटा सामान्यांच्या संपर्कात आल्याने विविध आजारांशी गाठ अगदी साहजिक आहे.

पाच प्रकारांचे जीवाणू नोटांवर आढळतात. त्यात ई कोलाई, स्टेफाइलोकोकस, स्लमोनेला एंट्रीटाइडिस, स्ट्रेप्टोफोकस, प्रोटियस असे जीवाणू असतात. या जीवाणूंमुळे प्रतिकारक क्षमता कमी होते. नोटांमुळे आजारी पडण्याचा फूड सेफ्टी अँड स्टँटर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने केलेला दावा खरा आहे. लोकांच्या संपर्कात या बाधित नोटा आल्याने गंभीर आजार होत आहेत. या जिवाणूंचा सर्वात जास्त धोका लहान मुले, महिला आणि वृद्धांना होतो.

कोणत्याही स्वरुपात नोटांच्या संपर्कात आल्याने जीवाणू आपल्या खाण्या-पिण्याद्वारे आपल्या पोटात जातात. त्यामुळे आजारी पडण्याची धोका आणखी बळावतो. त्यामुळे नोटांना स्पर्श केल्यानंतर व्यवस्थित हात धुणे गरजेचे आहे. हा धोका टाळण्यासाठी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांनी स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. तसेच हातमोज्यांचा वापरही अनिवार्य करण्याची गरज आहे. अन्यथा गाठ आजारांशी आहे. तेव्हा पैसे हाताळताना जरा जपूनच हाताळा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment