गुगलची कमलादेवी चट्टोपाध्याय यांना डुडलद्वारे आदरांजली


मुंबई – गुगलने डुडलद्वारे समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या ११५व्या जयंतीनिमित्त त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली असून ३ एप्रिल १९०३ रोजी कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला होता. गुगलने ‘Kamaladevi Chattopadhyay’s 115th Birthday’ या शीर्षकांर्तगत डुडल साकारुन कमलादेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चट्टोपाध्याय यांनी केलेल्या कार्याची झलकही यामध्ये पाहायला मिळत आहे.

कमलादेवी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रंगभूमी व हातमागावरील उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. त्यांनी शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. आज भारतात कलमादेवी चट्टोपाध्याय यांच्या दूरदृष्टीमुळेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकॅडमी, सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज इम्पोरियम आणि क्राफ्ट काऊंसिल ऑफ इंडिया या कला प्रदर्शनासंबंधित संस्था पाहायला मिळत आहेत.

मंगळुरू (कर्नाटक) येथे कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील मंगळुरूचे जिल्हाधिकारी होते. केवळ सात वर्षांच्या असताना कमलादेवी यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वयाच्या १४ व्या वर्षी कमलादेवी यांचा विवाह झाला. त्यांचे पती कृष्ण राव यांचे लग्नाच्या २ वर्षांनंतर निधन झाले. चेन्नईच्या क्वीन मेरीज कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना सरोजिनी नायडू यांच्या छोट्या बहिणीसोबत त्यांची भेट झाली. कमलादेवी व भाऊ हरेंद्र नाथ चट्टोपाध्याय यांची गाठभेट त्यांनी घालून दिली. भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली व दोघे विवाहबंधनात अडकले. पुर्नविवाहमुळे त्यांना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला, मात्र लोकांच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.