ग्रँड क्रॅब – आणखी एका संगणक विषाणूबद्दल इशारा जारी


गेल्या वर्षी जगभरात हजारो संगणक आणि मोबाईलना लॉक करून खंडणी वसूल करणाऱ्या लॉकी रॅन्समवेअरनंतर आता आणखी एका संगणक विषाणूबद्दल इशारा देण्यात आला आहे. ग्रँड क्रॅब असे या विषाणूचे नाव असून तो संगणकांना हॅक करून खंडणी मागतो.

सायबर जगतात या विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे चिंतित झालेल्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या विषाणूबद्दल सावधगिरीचा इशारा प्रसिद्ध केला आहे. या अॅडव्हायजरीत सरकारी आणि गैर-सरकारी सर्व्हर ऑपरेटर्सना सावध करण्यात आले असून ग्रँड क्रॅब नावाच्या रॅन्समवेअरपासून सावधान राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. ग्रँड क्रॅबशिवाय लॉकी विषाणूचा पुन्हा हल्ला होऊ शकतो, असाही इशारा मंत्रालयाने दिला आहे.

कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी इन) या संस्थेलाही याबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा विषाणू संगणक जाळे किंवा सर्व्हरना गंभीररीत्या प्रभावित करू शकतो. ग्रँड क्रॅब ई-मेल लिंकद्वारे तसेच खोट्या जाहिराती व संकेतस्थळांच्या माध्यमातून सिस्टममध्ये येऊ शकतो.

ग्रँड क्रॅब हा विषाणू रशियन हॅकर्सनी तयार केला असून गेल्या दोन महिन्यांत त्याने 53 हजार वापरकर्त्यावर परिणाम केला आहे.

Leave a Comment