उद्यापासून तुमच्या खिशाला लागणार कात्री


नवी दिल्ली : अनेक बदल १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात होणार असल्यामुळे तुमच्या खिशाला उद्यापासून कात्री लागणार एवढे मात्र नक्की आहे. तुमच्या किचनचे बजेट वाढणार आहे. तर अनेक गृहोपयोगी वस्तूंचे दर वाढणार आहेत. नव्या आर्थिक वर्षापासून सर्व प्रकारच्या उत्पन्‍नावरील प्राप्तीकरावर १ टक्‍का अतिरिक्‍त उपकर (सेस) भरावा लागणार आहे. त्याशिवाय रविवारपासून अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेले अनेक नवीन करप्रस्ताव लागू होतील. त्यात शेअर विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर, तीनऐवजी चार टक्के आरोग्य आणि शिक्षण ‘सेस’, ज्येष्ठ नागरिकांना ५० हजारांपर्यंत व्याजावर आयकरात सूट यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

याशिवाय बहुचर्चित ई-वे बिल प्रणाली देखील उद्यापासून लागू होत आहे. २५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणार्‍या व्यावसायिकांवर कॉर्पोरेट करात कपात करून ३० ऐवजी २५ टक्के करण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एनडीए सरकारच्या शेवटच्या संपूर्ण अर्थसंकल्पात कररचनेत फारसा बदल केला नव्हता, पण अतिश्रीमंतांवर १०-१५ टक्के सरचार्ज कायम ठेवतानाच इतर सर्व प्रकारच्या करयोग्य उत्पन्‍नावरील आरोग्य आणि शिक्षण उपकर लागू केला. पूर्वी तीन टक्के असणारा हा उपकर आता चार टक्के होईल.

Leave a Comment