३५० रुपयांचे नाणे मागणीप्रमाणेच मिळणार


नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक गुरु गोविंदसिंहजींच्या 350 व्या जयंतीचे औचित्य साधून ३५० रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे. मर्यादित या नाण्यांची संख्या असल्याने ते नोंदणी केलेल्यांनाच प्राप्त होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे. साधारणपणे ३४ ते ३५ ग्रॅम वजनाच्या या नाण्यामध्ये ५० टक्के चांदीचा वापर केला जाणार आहे. तसेच साधारणपणे ४४ मिलिमीटर व्यासाच्या या नाण्यासाठी ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्ताचा वापर केला जात आहे.

गुरु गोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे नाणे तयार केले जाणार असल्याने त्याची संख्या मर्यादित आहे. एका बाजूस अशोकस्तंभ आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजुला तख्त श्रीहरि मंदिर पटनासाहिब याची प्रतिकृती असेल. याच्या एका बाजूला वर्ष १६६६ ते २०१६ असे लिहिलेले असेल. तसेच गुरु गोविंदसिंहजी यांची ३५० वी जयंती असेही लिहिलेले असेल. नाणे प्राप्त करण्यासाठी आगाऊ मागणी मुंबई अथवा कोलकात्ता येथील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात करावी लागणार आहे. केवळ नोंदणी करणाऱ्या ग्राहकांनाच हे नाणे वितरीत केले जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

Leave a Comment