क्रेझ युट्यूबची – 80% पेक्षा अधिक भारतीय वापरकर्ते


भारतातील सर्व वयोगटातील 80% पेक्षा अधिक वापरकर्ते युट्यूबवर व्हिडिओ पाहतात, अशी माहिती गुगल इंडियाने दिली आहे. या लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्मचे फक्त मोबाईल फोनवर 22 कोटी 50 लाख मासिक सक्रिय वापरकर्ते असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

युट्यूब मुख्य व्यवसाय अधिकारी रॉबर्ट किंसल म्हणाले की, युट्यूबवर सध्या वाहिन्यांची संख्या 300 एवढी असून त्यांचे 10 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. तीन वर्षांपूर्वी 2014 मध्ये फक्त 16 होते.

“गेल्या काही वर्षांमध्ये, गतिशील सामग्री आणि वापरकर्त्यांचा बाजार म्हणून भारतात यूट्यूबचा उदय झाला आहे आम्ही निर्मात्यांना पाठिंबा देत राहू आणि त्यांच्या विविध विषयांना प्रोत्साहित करत राहू , ” असे किंसल म्हणाले.

गेल्या दोन वर्षांत प्रादेशिक प्रेक्षकांची संख्या तिप्पट झाली असून हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सामग्री पाहण्याच्या वेळेत प्रचंड वाढ दिसून येत आहे. उर्वरित जगाशी तुलना करता भारत ही अधिक सक्रिय बाजारपेठ असल्याचेही गुगलने म्हटले आहे. येथे 65 टक्के पेक्षा जास्त प्रेक्षक चॅनेलची सदस्यता घेतात आणि 10 पैकी 7 प्रेक्षक ऑडिओ चालू असताना जाहिराती पाहतात. विशेष म्हणजे 90 टक्के व्हिडियो स्थानिक भाषांमध्ये पाहिले जातात, असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.