अन्नपदार्थांची ही कॉम्बिनेशन ठरू शकतात अपायकारक


अनेकदा, भोजन झाल्याच्या काही काळानंतर पोट दुखू लागणे, जडपणा वाटणे, किंवा मळमळ अश्या तक्रारी उद्भवतात. आता अन्नपदार्थ घरीच शिजविलेले असतात, ताजे, आणि गरम अन्न आपण खाल्लेले असते, पदार्थांमध्ये तेल, मसाले देखील अवाजवी प्रमाणामध्ये वापरलेले नसतात. इतके करूनही अपचन, पोटदुखी ह्या तक्रारी का उद्भवाव्यात? याचे निदान कुठला पदार्थ इतर कोणत्या पदार्थाबरोबर मिसळून बनविला गेला आहे, हे जाणून घेण्यात असू शकते. काही अन्नपदार्थांची कॉम्बिनेशन्स शरीरासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये अपायकारक ठरू शकतात.

आपल्या खाद्यसंकृतीमध्ये अन्नपदार्थांच्या काही जोड्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी समजल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ दुध आणि हळद, किंवा तूप आणि गूळ, डाळी आणि दही ही, आणि अशी अनेक कॉम्बिनेशन्स सर्वमान्य आहेत. हे अन्नपदार्थ एकमेकांस पूरक असून, शरीराला पोषण देणारे आहेत. पण काही अन्नपदार्थांची केली गेलेली कॉम्बिनेशन्स पचनतंत्रामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. परिणामी पचन, पोटदुखी, गॅसेस या सारख्या तक्रारी सुरु होतात.

उन्हाळयाचे दिवस सुरु झाले की घराघरामध्ये आंब्यांची रेलचेल सुरु होते. तसेच शरीराला थंडावा मिळावा म्हणून काकडी देखील आवडीने खाल्ली जात असते. पण हे दोन्ही पदार्थ एकत्र, एकाच वेळी खाणे अपायकारक ठरू शकते. म्हणजेच आमरस आणि काकडीची कोशिंबीर, किंवा सलाडमधील काकडी असे एकाच वेळी जेवणामध्ये घेऊ नये. ह्या दोन्ही पदार्थांच्या पचनासाठी वेगवेगळ्या एन्झाईम्सची आवश्यकता असते. हे दोन्ही एन्झाईम्स एकेमेकांना प्रभावहीन करणारी आहेत. म्हणूनच हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले गेले तर त्यांचे पचन व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी पोटदुखी किंवा गॅसेस, पोट भारी वाटणे अश्या तक्रारी सुरु होतात.

दुग्धजन्य पदार्थ आणि पालक हे कॉम्बिनेशन देखील एकत्र नसावे. खरेतर पालक पनीर म्हटले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. पण आहारतज्ञांच्या मते हे दोन्ही पदार्थ एकत्र न खाता वेगवेगळे खावयास हवेत. पनीरमध्ये कॅल्शियम असते, व पालकामध्ये ऑक्सिलिक अॅसिड असते. पालकातील हे अॅसिड शरीरामध्ये कॅल्शियम अवशोषित करण्यात अडथळा निर्माण करते. म्हणून पालक आणि पनीर वेगवेगळे खाणे श्रेयस्कर आहे.

शेंगभाज्या, कडधान्ये किंवा डाळी आणि दुध हे कॉम्बिनेशन देखील टाळायला हवे. दुधाचे पचन पोटामध्ये न होता, ड्यूडेनम नामक अवयवामध्ये होत असते. ड्यूडेनम हा लहान आतड्याचा भाग आहे. दुध, हे भोजनाचे संपूर्ण आणि सांद्रित ( concentrated ) रूप आहे, त्यामुळे हे पचविण्यासाठीची पचनक्रिया निराळ्या प्रकारची असते. तर डाळी, किंवा कडधान्ये यांच्यामध्ये असलेली तत्वे देखील पचनास जड असतात. त्यामुळे दोन्ही पदार्थ एकाच वेळी खाल्ले गेले तर पचनक्रिया धीमी होते, आणि पचन व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे हे पदार्थ एकत्र, एकाच वेळी खाणे टाळायला हवे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment