वर्क आउट केल्यानंतर ह्या पेयांचे सेवन वजन वाढविण्यास कारणीभूत


जिम मध्ये किंवा घरी वर्क आउट किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्यास त्यानंतर खूप तहान लागते. त्यावेळी साधे पाणी पिणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. मात्र काही लोक पाण्याऐवजी बाजारामध्ये मिळणारी कृत्रीम पेये पिऊन आपली तहान भागवीत असतात. वर्क आउट केल्यानंतर काही कृत्रिम पेयांमुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुले वर्क आउट नंतर त्वरित ह्या पेयांचे सेवन करणे टाळायला हवे. तसेच पाणी किंवा इतर कृत्रिम पेयांच्या ऐवजी देखील काही पेयांचे सेवन करता येते.

व्यायाम केल्यानंतर कधीही पॅकेज्ड फळांच्या रसांचे सेवन करू नये. ह्यामध्ये फ्रुक्टोज मोठ्या प्रमाणावर असते. तसेच ह्यामधील कॉर्न सिरप वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. हे ज्यूस बनविताना फळांवर केल्या गेलेल्या प्रक्रियांमुळे त्यांच्यामधील पौष्टिक गुण कमी झालेले असतात. त्यामुळे पॅकेज्ड फ्रुट ज्युसेसचे सेवन व्यायाम केल्यानंतर टाळायला हवे. पॅकेज्ड फळांच्या रसांप्रमाणेच सोडा युक्त पेये किंवा कोल्ड ड्रिंक्स देखील टाळावीत. आजकाल बाजारामध्ये डायट सोडा किंवा डायट कोल्ड ड्रिंक्स उपलब्ध असतात. यांचेही सेवन टाळावे. ह्या डायट ड्रिंक्स किंवा सोडा युक्त ड्रिंक्समुळे तहान भागून तात्पुरती एनर्जी मिळते, पण काही वेळाने ही एनर्जी कमी होऊ लागते.

व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीराला हायड्रेट करणे, म्हणजेच शरीरामध्ये पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे असते. व्यायामामुळे शरीरातून आलेल्या घामामुळे शरीर थोडेसे डीहायड्रेट होते. त्यातून व्यायामानंतर त्वरित अल्कोहोलचे सेवन केले तर शरीर आणखीनच डीहायड्रेट होते. त्यामुळे व्यायाम संपविल्यानंतर जिममधून तुम्ही परस्पर एखाद्या मेजवानी करिता जाणार असाल, तर तिथे मद्यपान आवर्जून टाळा. तसेच व्यायाम केल्यानंतर चहा- कॉफी देखील टाळावी.

व्यायाम केल्यानंतर साधे पाणी पिणे हा पर्याय सर्वात उत्तम. तसेच पाणी थंड नसून, ते पिताना बसून, सावकाश प्यावे. नारळाचे पाणी, ताक, ताज्या फळांचा, साखर न घातलेला रस, लिंबाचे सरबत, ही पेये व्यायाम केल्यानंतर सेवनास उत्तम आहेत. व्यायामानंतर दुधाचे सेवन ही केले जाऊ शकते. मात्र त्यामध्ये साखरेचा वापर टाळावा.