सकाळच्या न्याहारीसाठी हे भारतीय पदार्थ उत्तम


सकाळची न्याहारी किंवा ब्रेकफास्ट हे आपल्या दिवसभरामधील सर्वात महत्वाचे भोजन आहे. कारण या भोजानातून दिवसभराच्या मेहनतीसाठी आवश्यक असणारे इंधन, म्हणजेच उर्जा आपल्याला मिळत असते. आपण जेव्हा सकाळी झोपून उठतो, तेव्हा आपल्या शरीरामधील ग्लुकोजचा साठा कमी झालेला असतो, म्हणूनच सकाळी फारशी एनर्जी आपल्या शरीरामध्ये नसते. त्यामुळे सकाळी फायबरचे प्रमाण जास्त आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असणारा नाश्ता घेतला, तर शरीरामध्ये स्फूर्ती येऊन शरीराचा थकवा निघून जाण्यास मदत मिळते. सकाळच्या नाश्त्यासाठी अनेक पारंपारिक भारतीय पदार्थ उत्तम समजले गेले आहेत.

दलिया, म्हणजेच गव्हाच्या कण्या, हा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. या मध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असून, हा पदार्थ लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहे. आपले शरीर ज्या वेगाने कर्बोदकांचे रुपांतर ग्लुकोजमध्ये करते, त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हटले जाते. दलियामधे हा इंडेक्स कमी असल्याने शरीरामध्ये ग्लुकोजचे संचरण धीम्या गतीने होत जाते, व त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल्स नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दलिया पचण्यास हलका असून, त्यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास दूर होतो.

उपमा हा पदार्थ रव्याने बनविला जात असून, प्रथिनांनी परिपूर्ण आहे. हा ही पदार्थ लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहे, व पचण्यास हलका आहे. ब जीवनसत्वाने युक्त आणि फायबरने परिपूर्ण असलेला ठेपला हा पदार्थ पोट जास्त काळ भरलेले ठेवतो. ठेपल्याच्या पीठामध्ये पालक, गाजरे, या भाज्या घालून याची पौष्टिकता आणखी वाढविता येऊ शकते. ठेपल्यांमध्ये वापरली जाणारी मेथी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याची उत्तम स्रोत असून, यामुळे हाडांना पोषण मिळते.

मोडविलेली कडधान्ये जीवनसत्वे आणि प्रथिनांनी युक्त आहेत. तसेच यामध्ये लोह, पोटॅशियम, फायटोकेमिकल्स, बायोफ्लावेनॉइड्स आहेत. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून, ह्याच्या सेवनाने शरीराला फ्री रॅडीकल्स मुळे होणारी हानी टाळता येऊ शकते. तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये पनीर घेणे ही चांगले.

Leave a Comment