असा करा ‘ई’ जीवनसत्वाचा उपयोग


ई जीवनसत्वामध्ये हायड्रेटिंग आणि अँटी एजिंग प्रॉपर्टीज असल्याने हे जीवनसत्व त्वचा आणि केस या दोन्ही करिता अतिशय फायदेकारक आहे. ई जीवनसत्वाच्या कॅप्स्युल्स बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहेत. ह्या कॅप्स्युल्स मधील जेल काढून ते केसांना किंवा त्वचेवर लावल्यास चांगले परिणाम दिसून येतात. वाढत्या वयामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या ई जीवनसत्वाच्या वापराने कमी करता येतात. हे जीवनसत्व क्षतिग्रस्त कोशिकांना दुरुस्त करते, आणि त्वचेला आर्द्रता प्रदान करते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

ई जीवनसत्व अँटी ऑक्सिडंट्स ने युक्त आहेत. त्यामुळे त्वचेच्या नैसर्गिक ‘हिलिंग प्रोसेस’ साठी हे जीवनसत्व अतिशय लाभकारी आहे. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी ई जीवसत्वाची कॅप्स्युल कापून घेऊन त्यामधील जेल काढून घ्यावे, आणि चेहऱ्यावर डाग असतील तर त्यांवर लावावे. ई जीवनसत्व त्वचेतील कोलाजेन वाढविण्यास सहायक आहे. त्यामुळे हे लावल्याने चेहऱ्यावरील काळसर डाग निघून जाण्यास मदत मिळते.

त्वचेतील काही भागांमध्ये मेलानिन आवश्यकतेपेक्षा अधिक झाल्याने त्वचेवर हायपर पिग्मेंटेशन दिसून येते. त्यामुळे त्वचेचा रंग असमान दिसू लागतो. अश्या वेळी ई जीवनसत्वाच्या कॅप्स्युलचे दररोज सेवन करावे आणि यातील जेल पण डागांवर लावावे. कॅप्स्युल्सच्या सेवनापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घेतलेला असावा. जर हातापायांवरील त्वचा सतत रुक्ष होत असेल, तर ई जीवनसत्वाचे जेल लावावे. यामुळे त्वचेला आर्द्रता मिळून हात पाय मुलायम होतील. थंडीच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळ्यातही उष्णतेने ओठ फाटतात, ई जीवनसत्व जेल लावल्याने ओठ मुलायम राहतात.

केसांचे आरोग्य राखण्याकरिता आठवड्यातून दोन वेळा खोबरेल तेलाने मालिश करावी. त्यावेळी तेलामध्ये ई जीवनसत्व जेल मिसळावे. जेल ऐवजी ई जीवनसत्व युक्त तेल मिसळल्याने देखील फायदा होतो, ई जीवनसत्व तेल आणि खोबरेल तेल समप्रमाणात घेऊन त्याने केसांची मालिश करावी. या तेलाने मालिश केल्याने केसांचा कोरडेपणा कमी होईल आणि डोक्यातील कोंडा नाहीसा होण्यास मदत मिळेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment