अतिप्रमाणात काजूचे सेवन आरोग्यास अपायकारक


काजू हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. तसेच काजूच्या सेवनाने कोलेस्टेरोल नियंत्रणामध्ये राहते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. काजूचे नियमित सेवन स्मरणशक्ती तल्लख करण्यास सहायक आहे. शरीरामध्ये उर्जेची निर्मिती करणारा हा खाद्यपदार्थ हाडांना बळकटी देण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास देखील सहायक आहे. त्यामुळे काजुंचे सेवन आपल्या आहारामध्ये जरूर असायला हवे. मात्र काजुंचे अति प्रमाणात केले गेलेले सेवन आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकते.

सुक्या मेव्याचे सेवन उत्तम शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे हे जरी खरे असले तरी सुक्या मेव्यामधील काजूसारखा मेवा जास्त जास्त प्रमाणात खाल्ल्याने नुकसानही होऊ शकते. काजुंच्या सेवनाने शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर उर्जा निर्माण होत असते. त्यामुळे ज्यांना दिवसभरामध्ये भरपूर शारीरिक हालचाल किंवा श्रम असतात, त्यांच्यासाठी काजुंचे सेवन फायदेशीर असू शकते. मात्र ज्यांना दिवसभर बसूनच काम करावे लागते, किंवा ज्यांची शारीरिक हालचाल दिवसभरामध्ये अतिशय कमी आहे, त्यांच्यासाठी मात्र काजू अपायकारक ठरू शकतो.

ज्या व्यक्ती आपले वजन घटविण्याचा प्रयत्न करीत असतील, त्यांनी काजुंच्या सेवनावर नियंत्रण ठेवायला हवे. काजू वजन वाढण्यास कारणीभूत असू शकतो. तीन ते चार काजुंमध्ये सुमारे १६५ कॅलरिज असतात. तसेच यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे ज्यांचे वजन अतिशय कमी असते, व त्यांना ते वाढविण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी काजुंचे सेवन फायद्याचे ठरू शकते. पण ज्यांना वजन घटवायचे आहे, त्यांनी काजू लांबच ठेवावेत.

काही व्यक्तींना अति प्रमाणात काजू खाल्ल्याने अॅलर्जी होण्याची शक्यता असते. अनेकदा काजू खाल्ल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो, पित्त होऊ शकते, चेहऱ्यावर आणि शरीरावर इतर ठिकाणी लाल चट्टे उठतात, सतत खाज सुटू लागते, उलट्या होऊ शकतात, किंवा पोट बिघडू शकते. त्यामुळे काजू किंवा काजू पेस्ट घातलेल्या एखाद्या पदार्थाच्या सेवनानंतर जर अश्या काही तक्रारी उद्भविल्या तर त्या काजुंच्या सेवनाने अलर्जी झाल्यामुळे उद्भविल्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे यासाठी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

ज्यांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो, किंवा अॅसीडीटी होते, त्यांनी काजुंचे सेवन करू नये. तसेच ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी देखील काजूचे सेवन टाळावे. काजुमध्ये असलेली टाईरामीन आणि फेनेलेथाईल्मीन ही अमिनो अॅसिड्स डोकेदुखी उद्भविण्यास कारणीभूत ठरू शकतात. आपण काही कारणाने काही औषधे घेत असल्यास काजुंच्या सेवनाने औषधे लागू पडण्यास अडचण येऊ शकते. काजुमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असून ह्यामुळे मधुमेह, थायरॉइड, आर्थ्रायटीस, इत्यादी विकारांसाठी घेतली जाणारी औषधे लागू पडण्यास अडचण येऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment