मराठी विद्यापीठाचे स्वागत


महाराष्ट्रात नेहमीच मराठीची आबाळ होत असते. महाराष्ट्रात मराठी भाषा शिकणे सक्तीचे नाही यावर तर वाद जारी असतोच पण महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ नाही याबद्दल अनेकदा मराठी भाषा बोलणारांना नाराजी असते. आता मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कालच याबाबत घोषणा झाली आहे. सरकारने या विद्यापीठाला जागा मंजूर केली आहे. ही जागा मुबईत असून ती विद्यापीठ स्थापनेत पुढाकार घेणार्‍या संस्थेला सुपूर्त केली जाणार आहेे. या कामात ग्रंथाली या संस्थेने पुढाकार घेतला आहे. अर्थात या कामाला ती संस्था योग्य आहे पण हे काम सरकारने करायला हवे होते असे वाटल्याविना रहावत नाही.

ग्रंथाली ही पुस्तकांच्या प्रसारात अग्रभागी असणारी संस्था असून तिची स्थापना काही पत्रकारांनी पुढाकार घेऊन केली आहे. मराठीतली जी पुस्तके मौल्यवान आहेत पण ती धंदेवाईक प्रकाशकांकडून प्रकाशित केली जात नाहीत. अशी पुस्तके नफ्या तोट्याचा विचार न करता प्रकाशित करण्याकामी ग्रंथालीने मोठे काम केलेले आहे. अरुण साधू, कुमार केतकर अशा लोेकांनी या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता आणि अनेकदा स्वत: हजेरी लावून महाराष्ट्रभर पुस्तकांवर चर्चा आणि विक्री यासाठी दौरे केले आहेत. आता ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल हे काम पाहतात. तेच आता थिंक महाराष्ट्र हाही उपक्रम राबवत असतात. या उपक्रमातून सारा महाराष्ट्र डिजिटल माध्यमात बंद करण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना आता महाराष्ट्र विद्यापीठाची नियोजित जागा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्त केली जाणार आहे.

मराठी विद्यापीठ हे मोठे काम आहेे. महाराष्ट्र शासन जसे मराठी विश्‍वकोषाचे काम स्वत:चे म्हणून करत असते आणि सरकारच्या मदतीवर ते चालत असते तसेच हे विद्यापीठही चालवले गेले पाहिजे. मराठीला अभिजात दर्जा मिळत नाही याची मोठी खंत व्यक्त केली जाते खरी पण ही खंत व्यक्त करणारे तिच्या विकासासाठी काय करीत असतात ? ते स्वत: काही करीत नाहीत पण मराठीला अभिजात दर्जा मिळत नाही ही जणू सरकारचीच चूक आहे असे म्हणून यावरून सरकारवर टीका करीत असतात. अशा लोकांनी जरा अंग मोडून काम करून मराठीच्या विकासाला गती दिली पाहिजे आणि मराठीच्या विकासाची जबाबदारी सर्वांचीच आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Comment